Dainik Maval News : वराळे गावाजवळील (ता. मावळ) इंद्रायणी नदीत एका 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत नदीमध्ये पोहण्यासाठी आला होता. पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. मुलाचा मृतदेह सोमवारी (दि. 9) सायंकाळी पाण्याबाहेर काढण्यात आला.
सुंदराम सिंग (वय 14) असे बुडून मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. सुंदराम त्याच्या मित्रांसोबत वराळे गावाजवळ इंद्रायणी नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्यातील चौघांना पोहता येत होते. ते पोहत पोहत नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर गेले. सुंदराम आणि त्याच्या दुसऱ्या मित्राला पोहता येत नव्हते. तरीही ते पाण्यात उतरले. नदीच्या काठावर पोहत असताना सुंदराम बुडाला आणि वरती आलाच नाही.
सुंदराम बुडाला असे समजताच त्याचे मित्र घरी निघून गेले. त्यांनी कुणाला काहीही सांगितले नाही. दरम्यान सुंदराम याच्या पालकांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता त्याचे कपडे इंद्रायणी नदीच्या काठावर सापडले. त्यानंतर पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने नदीपात्रात त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी बाहेर काढण्यात आला.
शोधकार्यात आमदार सुनिल शेळके यांचे कार्यकर्ते श्रीनिवास तळेगावकर यांनी सहकार्य केले. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, भास्कर माळी, गणेश गायकवाड, गणेश सोंडेकर, प्रशांत भालेकर, शुभम काकडे, राजु सय्यद यांनी शोध मोहीम राबवली. तळेगान एमआयडीसी पोलीस हद्दीत ही घटना घडली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे तळेगाव नगरपरिषदेचे लक्ष्य । Talegaon Nagar Parishad
– लगीनसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांना मागणी वाढली ; फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस
– युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश ; खासदार श्रीरंग बारणे यांनी केले स्वागत । Maval Lok Sabha