Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत १६२ इमारती धोकादायक असल्याचे नगरविकास विभागाने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. सदर इमारती जीर्ण झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत. त्यापासून जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने त्या ताबडतोब काढून टाकण्याबाबत मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी संबंधित घरमालकांना नोटीसा बजावल्या आहेत.
नगररचना विभागाने गेल्या महिन्यात शहर परिसरातील इमारतींची बाह्य पाहणी केली. त्यात १६२ घरे आणि इमारतींची दुरवस्था झाली असल्याचे निदर्शनास आले. भिंती कमकुवत होणे, मोडकळीस येणे, पाया खचणे, छताचा आधार कमकुवत होऊन ते तिरके होणे, यामुळे त्या कधीही पडण्याचा धोका असल्याचे पाहणीत आढळले.
मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये ७० ते १०० वर्षे जुन्या इमारतींची संख्या सर्वाधिक आहे. मूळ गावठाणात तसेच वस्त्यांमध्ये असलेल्या या बैठ्या निवासी घरांमध्ये अजूनही नागरिक राहत आहेत. महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १९५ नुसार वापरात असलेली मिळकत काढून टाकण्यासाठी नोटीशीत बजावले आहे.
नोटीसीत, बांधकाम धोकादायक झाल्याचे निदर्शनास आले आहे. या मिळकत बांधकामामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना धोका व वित्तहानी होऊ शकते, असा दावा केला आहे. त्यामुळे या इमारत बांधकाम मोकळे करुन त्वरित उतरवून घ्यावे. या इमारत बांधकामामुळे आजुबाजूच्या रहिवाशांना धोका अथवा अपाय झाल्यास तसेच या ठिकाणी काही जीवित वा वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी घरमालकांची असेल, असा स्पष्ट उल्लेख आहे.
कोणत्याही नुकसानीस नगरपरिषद जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी, अथवा इमारत धोकादायक नसलेबाबत नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंता यांचेकडील स्ट्रक्चरल ऑडीट सादर करावे, असे म्हटले आहे. शुक्रवारपासून (दि.१९) अशा सर्व इमारतींवर धोक्याची सूचना दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime