मावळ तालुक्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी, ओढे, प्रवाह दुथडी भरून वाहू लागले असून तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात देखील झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मावळ तालुक्यातील प्रमुख पवना धरण हे चाळीशी पार गेले असून अन्य धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. नाणे मावळ भागातील वडिवळे धरण हे 80 टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.
नागरिकांसाठी सुचना –
“आज 21 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजता वडिवळे धरण 80 टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये वाढ झाल्यास व पाऊस सुरू राहिल्यास परिस्थितीनुसार वडिवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडलिका नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागेल. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.” अशी सुचना वजा आवाहन सहाय्यक अभियंता यांनी केले आहे.