पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सुटणार आहे. चाकण, तळेगाव दाभाडे, भोसरी एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया करुनच सोडले जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारणार आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत हे गुरुवारी (दि.22) महापालिकेत जिल्ह्यातील संबंधित अधिका-यांची बैठक घेणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत खासदार बारणे यांच्या पुढाकारातून उद्योगमंत्री सामंत यांच्यासोबत आज (मंगळवारी) मुंबईत बैठक झाली. बैठकीला उद्योग विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. एमआयडीसीचे रसायनमिश्रित पाणी थेट नदीपात्रात जावू नये यासाठी गुरुवारी (दि.22) सकाळी 11 वाजता उद्योगमंत्री सामंत हे पिंपरी महापालिकेत बैठक घेणार आहेत. आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आयुक्त, एमआयडीसीचे अधिकारी अशी संयुक्त बैठक होणार आहे. ( MIDC will set up STP Industries Minister Uday Samant will hold meeting said MP Shrirang Barne )
खासदार बारणे म्हणाले, नदी स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी इंद्रायणी, पवना नदी पात्राच्या अस्वच्छतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्र्यांना सूचना दिल्यानंतर आज बैठक झाली. चाकण, तळेगाव दाभाडे, भोसरी एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी नदी पात्रात थेट सोडले जाणार नाही. प्रक्रिया करुनच पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यासाठी एसटीपी उभारण्यात येणार आहेत. तळेगाव दाभाडे, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डमधील पाणी प्रक्रिया करुनच सोडण्याबाबत जिल्हाधिका-यांना सूचना दिल्या जाणार आहेत. पवनामाई, इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवली जाणार आहे. नदीचे पावित्र्य जपले जाईल. नदी प्रदुषित करणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
उगमस्थानापासूनच प्रदूषण रोखण्याचा संकल्प
पवना, इंद्रायणी नदीच्या उगमस्थानापासूनच प्रदूषण रोखण्याचा संकल्प खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. त्याकरिता नदी स्वछतेसाठी काम करणाऱ्या जलदिंडी प्रतिष्ठान व सिटिझन फोरमसह महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक देखील घेतली आहे. नदीच्या उगमस्थानापासूनच नदीत सोडले जाणारे सांडपाणी अडविण्यात येणार आहे. प्रक्रिया करूनच पाणी नदीत सोडण्यासाठी ज्या गावातून नदी वाहते, त्या प्रत्येक गावातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शाळा यांना सोबत घेऊन नदी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– ‘किल्ले लोहगडावरील अतिक्रमण हटवा, अन्यथा…’, लोहगड मुक्तीसाठी एकवटले हिंदू बांधव । Lohagad Fort News
– तोतया नौदल अधिकाऱ्याचा पर्दाफाश, दोन साथीदारांसह गजाआड; लोणावळा शहर आणि INS शिवाजी नेव्हल पोलिसांची कारवाई