केरळचा रहिवासी असलेला दुर्गवेडा युवक हमरास… छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात साडेतीनशे किल्ले सर करण्याच्या जिद्धीने आला… परंतू मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातील मोरगिरी किल्ल्याच्या दरीत तो अडकला… ही घटना आहे 21 ऑक्टोबरची.. शिवदुर्ग रेस्क्यू टीम ने हमरासचा घेतलेला शोध हा एक थरारक अनुभव आहे… ( Rescue of Kerala Youth at Morgiri Fort by Shivdurg Rescue Team Lonavala )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“दिनांक 21/09/2022 दुपारी एक कॉल आला. एक व्यक्ती तुंग किल्ल्याचे जवळ मोरगिरी किल्ल्यावर वाट चुकला आहे व मदत पाहिजे आम्ही त्या चुकलेल्या व्यक्तीचा फोन नंबर घेऊन त्या व्यक्तिला संपर्क केला. तो केरळचा आहे व मोडकी तोडकी हिंदी बोलत होता. त्याला लोकेशन पाठवायला सांगितले. व तो सुरक्षित ठिकाणी आहे याची खात्री केली. त्याला लोकेशन सोडून कुठेही जाऊ नको सांगितले. त्या ठिकाणी नेटवर्क चांगले होते त्यामुळे आहे तिथेच थांबून वाट बघायला सांगितले.”
“फोनचा वापर कमी करायला सांगितला. म्हणजे फोन बॅटरी संपुन फोन बंद होऊ नये व शोधकार्यात अडथळा येऊ नये म्हणून काळजी घ्यायला सांगितले. आम्ही चार वाजता घुसळखांब तुंग रोडवर जांभुळणे गावात पोचलो. कातकरी वस्तीजवळ गाडी लावली व स्थानिक हॉटेलमध्ये चौकशी केली. तर त्या हॉटेलमध्ये असलेल्या ताईने एक किमी पुढे हॉटेलच्या बाहेर त्याची सायकल लावली आहे असे सांगितले. व शोधकार्याला योग्य दिशा मिळाली.”
“आम्ही पुढे गेलो. सायकल पाहिली व चौकशी केली व माहीती घेऊन निघालो . आमच्या बरोबर त्या हॉटेलचे मालक आखाडे बाबा वय वर्षे 65-70 निघाले . खाली गावात अजिबात नेटवर्क नाही पण गडावर नेटवर्क होते. थोडा एक टप्पा चढून गेल्यावर आम्ही पुन्हा फोन लावला. आम्ही आलोय सांगितले. जागा सोडू नको सांगितले . साडे पाच वाजले होते त्याला आम्ही आलोय यांची खात्री होत नव्हती. म्हणून आमचा एक फोटो त्याला पाठवला. आम्ही वर वर चढतच होतो. जसा अंधार होत होता तसा तो बैचेन होत होता. तुम्ही कधी येणार? तुम्ही कधी येणार? किती वेळ लागेल?असे प्रश्न विचारत होता.”
“आम्ही त्याला नाव विचारले, त्याने हामरास सांगितले. तो आहे तिथून त्याला काय दिसते त्याचे फोटो काढून पाठवायला सांगितले. प्रचंड धूके असल्याने काहीच दिसत नव्हते. पण दुपारी काही फोटो काढले होते ते पाठवले. आम्ही ते नकाशाला जोडण्याचा प्रयत्न केला. परत काही अंतर चालून गेलो. कोणीतरी संस्थेने रुट मार्कींगचे बोर्ड चांगले लावले आहेत. रिबीन मार्कींग लावलेल्या आहेत. त्या आमच्या डोळ्यासमोरुन जात होत्या. आम्ही पुन्हा हामरासला फोन लावला. रस्त्यावरील सुरवातीपासून रुट मार्कींग केली आहे ते फॉलो केले आहे का?”
“त्याला समजले नाही की काय माहित नाही पण तो फॉलो केले असे बोलला. मग आम्ही कोणत्याही वेगळा विचार न करता मार्कींगचा धोपट रस्ता धरला. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. बरोबर आलेल्या आखाडे बाबांनी बरीच ओळखपाळख सांगून ते आमचे मित्र झाले. त्यांनी सांगितले की आता खडे चढण आहे व मी आता जास्त वर येत नाही चढाई झेपणार नाही. मी इथेच थांबतो. आम्ही बाबांच्या वयाचा विचार केला. व त्यांच्या बरोबर आमचा एक कार्यकर्ता ठेवायचे ठरवले व लगेचच निर्णय घेतला व आखाडे बाबा व आमचा एक कार्यकर्ता यांना खाली घराकडे जायला सांगितले.”
“आम्ही अवघड अशा खड्या चढायला सुरुवात केली या मार्गावर एक ठिकाणी दोर व शेवटी पाण्याची टाकी, जाखमाता देवी व तिथून पुढे वर जाण्यासाठी शिडी लावलेली आहे. आम्ही लवकर पोचायचे म्हणून घाईघाईने वर चढलो व लोकेशन चेक केले तर लोकेशन जवळ दिसतंय पण आम्ही कड्यावर व हामरास खाली खोल दरीत असे होते. म्हणून परत त्याला फोन लावला. तर या रस्त्याच्या असलेल्या सर्व खाणाखुणा त्याला सांगितल्या, पण त्याला त्या माहित नव्हत्या. तो तिकडे आलाच नाही हे त्याने आम्हाला सांगितले.”
“आता खालून वर रुट मार्कींग केलेला रस्ता इथपर्यंतच होता. त्याने रुट मध्येच सोडलेला दिसत होता व ती वाट आता आम्हाला शोधायची होती. मग परत आम्ही खाली उतरायची वाट धरली. हामरास आम्हाला सारखा फोन करत होता. तुम्ही लवकर या? किती वेळ लागेल? खरंच येताय ना? आता चांगला अंधार झाला होता. त्याला विश्वासच नव्हता आम्ही मदतीला येऊ. त्याला अपेक्षित होते की आम्ही सांगू की आता रात्र झाली आहे, आम्ही सकाळी येऊ.”
“एक मोठा टप्पा उतरून खाली आलो. व तो सरळ गेला असेल व रस्ता चुकला असेल असा अंदाज बांधून आम्ही दिशा घेतली. पावसाची रिप रिप चालू होती. फोन लोकेशन चेक करायला काढायला पण आता जमत नव्हते. अंधार झाला होता आता पाऊल वाटा दिसत नव्हत्या पण जनावरांच्या वाटा, काही माकड वाटा दिसत होत्या, लोकेशन मॅच केल्यावर आमची दिशा बरोबर होती पण अंतर खुप लांबचे दिसत होते. आणि आम्हाला पाऊलवाटेवर एक शुजचा फुट प्रिंट दिसला आम्ही लगेचच फोटो काढून घेतला व हामरासला पाठवला.”
“फोन करुन तो त्याचाच आहे का विचारलं तर त्यालाही ते माहीत नव्हते मग त्याने ते चेक केले व आम्हाला ओके सांगितले. आता शोधमोहिमेला दिशा मिळाली. आता दबलेले गवत चेक करत कड्याच्या कडेकडेने आम्ही पुढे सरकत होतो. धूक्यामुळे काही दिसत नव्हते सुरक्षित हळूहळू चाललो होतो मध्ये मध्ये शुजचा मार्क बघून सुखावत होतो. आम्ही हामरासला आहे त्याच ठिकाणी थांबायला सांगितले होते. तिथे तो सुरक्षित होता. त्याला वर खाली जाता येत नव्हते एका बाजूला धबधबा पडत होता तर एक बाजुला दरी होती. आता आम्ही त्याला आवाज देत होतो”
“आकाशात टॉर्च मारुन एकमेकांना दिसतोय का याचा प्रयत्न करत होतो. मग आवाज आला असा निरोप आला. मग टॉर्च लावून अंदाज घेत होतो तो दरीत होता तर त्याची लाईट आम्ही खाली शोधत होतो पण अचानक वरच्या दिशेने एक लाईट चमकली व आता आम्ही एकदम जवळ आलेलो होतो. पण घाई न करता आम्ही तुझ्या जवळ येतो मगच तु हालचाल कर असे त्याला सांगितले. मग आम्ही वर चढाई करून कारवीच्या जंगलातून त्यांच्यापर्यंत पोचलो”
“तो खुप आनंदी दिसत होता पण त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. आज माझा पुनर्जन्म झाला असा तो बोलत होता. असेही काम कोणी करत असेल असे स्वप्नातही त्याने विचार केला नव्हता. यात आमचा कोणताही स्वार्थ नाही हे त्याला समजले मग त्याने काही आमच्याबरोबर फोटो काढून घेतले व केरळी भाषेत काही व्हिडिओ बनवले.”
“मग आमची मैत्री झाली. त्यांचे 350 किल्ले पाहण्याचे ध्येय पाहून आम्ही थक्क झालो . विश्वास पण बसत नव्हता. आम्ही त्याला चेक करण्यासाठी कोणते किल्ले पाहिले. त्यानी नावे सांगितली. व आम्ही बोलत बोलत खाली आलो. तो दिवसभर जेवलेला नव्हता आम्ही दिलेली दोन चार बिस्किटे खावून सगळ्यांचे समाधानाने पोट भरले होते.”
“खाली पोचलो आखाडे बाबांच्या घरी जेवण करून आम्ही लोणावळाकडे परतलो . हामरास दुसऱ्या दिवशी सायकल वर येणार होता. आम्ही लोणावळ्यात यायचे निमंत्रण दिले. पुढील वाटचालीसाठी काही नियोजन करायचे ठरले होते. ते आम्ही केले व दोन दिवसांचा आमचा पाहुणचार घेऊन हामरास पालघरच्या दिशेला गेला. दुपारी तिन वाजता कॉल आला. रात्री 9.00 वाजता त्यांच्यापर्यंत पोचलो . रात्री दिड वाजता सर्व टिम सुखरुप घरी पोचलो”
– शिवदुर्ग रेस्कु टिम
अधिक वाचा –
– सह्याद्री प्रतिष्ठान आणि सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून 45 विद्यार्थ्यांना किल्ले लोहगड दुर्गदर्शन
– मावळचं राजकारण I मामाच्या केसालाही धक्का लागणार नाही, भाच्याने ठणकावून सांगितले