आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राज्यातील फुलशेतीसाठी वरदान असून हा देशातील एक यशस्वी प्रकल्प आहे, असे राज्याचे सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार म्हणाले. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत के. एफ. बायोप्लांट व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 16) आयोजित फुले पिक उत्पादने व सुगी पश्चात संबंधी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यक्रमास मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, राष्ट्रीय सुगी तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुभाष घुले, उपसंचालक राजेंद्र महाजन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, के. एफ. बायोप्लांटचे सरव्यवस्थापक आशिष फडके, आयसीएआर चे शास्त्रज्ञ डॉ.गणेश कदम, गणेश खिंड कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मोहन शेटे, डॉ.विष्णु गराडे, फूल उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते. ( Talegaon Dabhade Maharashtra magnet project boon for floriculture said Anup Kumar )
फुल शेतीमध्ये मूल्य साखळी विकसित होण्याची आवश्यकता असून यामुळेच फुलांचा समावेश मॅग्नेट प्रकल्पात केल्याचे सांगून श्री अनुपकुमार म्हणाले, तरुण फुल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्टार्टअपच्या माध्यमातून या संधीचा फायदा घेतला पाहिजे. फुल शेतीमध्ये महाराष्ट्र राज्य हे एक अग्रेसर राज्य म्हणून पुढे आले असून नांदेड, धाराशिव आदी जिल्ह्यामध्ये फुल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था हे फुल शेतीच्या मार्गदर्शनातील महत्वाची संस्था आहे, असेही ते म्हणाले.
कोकरे यांनी मॅग्नेट प्रकल्प बाबतची विस्तृत माहिती सादर करून फुल शेतीसाठी प्रकल्पाचे महत्त्व विषद केले. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मूल्य साखळी विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. फलोत्पादन व फुल शेतीसाठी मुदत कर्ज व खेळते भाग भांडवलासाठी मॅग्नेट प्रकल्पाच्या एफआयएल घटकांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा फायदा फुल उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. अमोल यादव यांनी केले.
संरक्षित फुल शेती बाबत के.एफ. बायोप्लांटचे फडके, फुल शेती लागवड याबाबत आयसीएआरचे शास्त्रज्ञ डॉ. कदम यांनी व फुलांची काढणी व्यवस्थापन व निर्यात याबाबत पंडित शिकारे आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये सर्व उपस्थित उत्पादक शेतकऱ्यांना सोएक्स फ्लोरा या फुलाची निर्यात करणाऱ्या कंपनीच्या प्रक्षेत्रास भेट देऊन त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या प्री कुलिंग,कोल्ड स्टोरेज ,पॅक हाऊस, फुलाची काढणी व विपणन या संदर्भात कंपनीचे संचालक नरेंद्र पाटील व सरव्यवस्थापक धनंजय कदम यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘फूल पीक माहिती पुस्तिकेचे’ प्रकाशनही यावेळी करण्यात आले. कार्यशाळेस इंडिका फ्रेशचे पंडित शिकारे, मॅग्नेट प्रकल्पाचे कैलास कुंभार, नितीन पाटील, चेतन भक्कड, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व राज्यातील फुल उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– बेगडेवाडी स्थानकावर रेल्वेतून उडी मारून आरोपी पसार, पोलिसांकडून शोधाशोध सुरु । Talegaon Dabhade
– पुणे विभागीय भरारी पथकाकडून परदेशी बनावटीच्या मद्यासह 11 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त । Pune Crime
– शनिवारी आणि रविवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा, नाहीतर मनस्ताप होईल