Dainik Maval News : प्रतिनिधी – संध्या नांगरे : बारावीनंतर लगेच घरच्यांनी तिचा विवाह उरकला… सुखाचा संसार फुलवण्याचं स्वप्न रंगवतानाच या नवविवाहितेसमोर आली तिच्या पतीची वाईट व्यसनं. पतीकडून होणारा त्रास, त्याची दुष्कृत्य. नवा संसार पुढं नेण्यासाठी ती सहन करत राहीली… पुढं पुढं पतीचा त्रास एवढा असह्य झाला की तिला संसाराबरोबर जीवनही संपवावं वाटलं. परंतु, पदरात असलेल्या दोन कोवळ्या लेकरांसाठी ही एकटीच आई दुर्गा बनून उभी राहिली. समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी धीरानं लढली आणि स्वबळावर ‘अन्नपूर्णा उपहारगृह’ सुरु करुन स्वतःचं वेगळं-ठळक अस्तित्व निर्माण केलं. या दुर्गेच्या संघर्षाची कहाणी हरेका स्त्रीला शहारे आणणारी आहे आणि तिचं नाव आहे गीता पवार (वय ४०).
गीताताई मूळच्या लातूरच्या. त्याचं शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे. संगणक प्रशिक्षण घेऊन त्यांनी विवाहापूर्वी नोकरीही केली. विवाहानंतर ताईंना नोकरीचं बोलावणं आलं होतं पण घरच्यांनी नोकरी करु दिली नाही. मग २००४ मध्ये त्या पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाल्या आहेत. तेव्हा ताईंचे पती चिंचवडला कंपनीत नोकरी करत होते. नंतर नोकरी सोडून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला त्यातही जम बसला नाही. ते कर्जबाजारी होत गेले आणि वाईट व्यसनांच्या आहारी गेले. पत्नी-मुलांची जराही फिकीर त्यांनी केली नाही. परिस्थिती अतिशय हालाखीची झाली होती. त्यामुळं २००७ मध्ये गीताताईंनी जेवणाचे डबे देण्याचं काम सुरु केलं आणि संसार सावरला.
- डब्यांच्या घरगुती व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्या जवळपासच्या परिसरात घरोघरी जाऊन स्वयंपाकाची कामं करु लागल्या. ताईंच्या हातचं जेवण ग्राहकांना फार आवडायचं. आता त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत होती पण नवरा मात्र आणखीन बिघडत चालला होता, तो ताईंना खूपच त्रास देऊ लागला. संसार टिकवण्यासाठी ताईंनी सगळं सहन केलं. आपली वाईट व्यसनं- कुकर्मांमुळं आपला सोन्यासारखा संसार उध्वस्त होतोय याचं त्याला काहीच वाटलं नाही.
पुढं, मुलंही शाळेत जाऊ लागली होती. त्यामुळं गीताताईंनी संसाराची पूर्ण जबाबदारी एकाहाती स्वतःच्या खांद्यावर घेतली. मुलांचं भविष्य त्यांना समोर दिसत होतं. अख्खा दिवस राबून त्या जेवणाचे डबे नि स्वयंपाकाची कामं करत राहिल्या. व्यसनी पतीला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, त्याची सेवा केली पण त्याच्यात बदल झाला नाही. अखेर ताई मुलांना घेऊन वेगळं राहू लागल्या. तेव्हा ही माय-लेकरं शांततेनं-समाधानानं जेवू लागली.
शिवणकला शिकूनही ताईंनी अर्थार्जन केलं. स्वयंपाकाच्या कामात जम बसल्यानं ताईंना ”मी स्वतःची खानावळ किंवा नाश्ता केंद्र सुरु केलं पाहिजे.” असं वाटत होतं. त्यामुळं कामाला जाता-येता व्यवसाय सुरु करण्यासाठी कुठं जागा दिसतेय का ? याचा त्या सतत शोध घेत होत्या. प्रयत्नांनी गीताताईंनी रहाटणी परिसरात एक छोटीशी जागा भाडेतत्वावर मिळवलीच. कोणालाही न सांगता स्वतःच विचारपूर्वक सर्व व्यवहार केला आणि सन २०२० मध्ये ‘अन्नपूर्णा’ नावानं स्वतःचं नाश्ता केंद्र सुरु केलं. त्यासाठी ताईंना त्यांनी जोडलेल्या स्नेही नेहा यांनी भरीव आर्थिक मदत केली.
चहा-पोह्यांनी केंद्राची यशस्वी सुरवात झाली. काही दिवसांतच तीन-चार तरुणांनी त्यांच्याकडे जेवणाचे डबे लावले, कोणी चहा मागवू लागले तर कोणी नाश्ता. मग, ताईंनी घरातली भरपूर भांडीही इथं आणली. आवश्यक सुविधा केल्या. चविष्ट पदार्थ व उत्तम दर्जा असल्यानं ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला आणि हे छोटं नाश्ता केंद्र ग्राहकांच्या आवडीचं टुमदार ‘अन्नपूर्णा उपहारगृह’ बनलं. उत्तम प्रतिसाद मिळाल्यानं नंतर ताई बाहेरची स्वयंपाकाची कामं थांबवून पूर्णवेळ उपहारगृहासाठी देऊ लागल्या.
- आता मुलं मोठी झाली असल्यानं मोठा मुलगा ऋषिकेश आईला सर्वतोपरी मदत करतोय. सोबतच ताईंचे आई-वडील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. सुरgवातीला आई-वडीलांना आपली मुलगी एकटीनं हे करु शकेल की नाही असं वाटलं, त्यांनी विरोधही केला होता पण ताईंनी मोठ्या जिद्दीनं-चिकाटीनं खानावळीच्या व्यवसायात यश मिळवलंय आणि एकटीचा संसार फुलवलाय. दोन्ही मुलांना त्या शिक्षण देत आहे आणि कशाचीही उणीव भासू देत नाहीयेत.
सध्या त्यांचे ७०-८० नियमित ग्राहक आहे. ताईंच्या उपहारगृहाचं रुपही अगदी आपल्या स्वतःच्या घराच्या स्वयंपाक घरासारखं स्वच्छ-नेटकं-प्रसन्न आहे. गीताताईंचं हसतमुख व्यक्तिमत्व पाहताना त्यांच्या जीवनातील संघर्षाची तसूभरही कल्पना येत नाही. संसारातील दु:खाचा लवलेशही त्यांच्या चेहरयावर दिसत नाही. पण, त्यांनी भोगलेल्या त्रासाची नि परिस्थितीशी दिलेल्या झुंजीची कहाणी ऐकताना डोळ्यांत पाणी तरळल्या वाचून नि अंगावर शहारे आल्यावाचून राहात नाही. गीताताईंनी सिद्ध केलेलं कर्तृत्व वंदनीय आहे.
गीताताई म्हणतात, “संसाराची वाताहत झाल्यावर मला खूप त्रास झाला. मी त्यातून बाहेर पडले. मुलांना मोठं करायचं होतं. मी कामं करत होते. पण मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं आणि आत्मविश्वासानं मी माझा व्यवसाय उभा केला. भविष्यात व्यवसाय वाढवण्याचा माझा मानस आहे. माझ्या वाट्याला जे आलं त्यावरुन सांगावं वाटतं की महिलांनी फक्त संसाराला वाहून न घेता आपण कोणासाठी काय आणि किती करतोय याचा विचार करुन स्वतःचं आयुष्य घडवावं.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अभिवादन नवदुर्गा : ‘दैनिक मावळ’च्या नवदुर्गा – 2023
1. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची…
2. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
3. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल
4. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
5. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास
6. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
7. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
8. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी
9. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी