Dainik Maval News : पुरातत्व खात्यामार्फत विविध बौद्ध लेण्यांचे तत्काळ संवर्धन व्हावे या मागण्यांकरीता मंगळवार, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन व तीव्र निदर्शने पातळेश्वर येथील पुरातत्व विभागीय कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. या आंदोलनात प्रचंड मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व आयोजक मिलिंद अहिरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी दीपक गायकवाड, मिलिंद आहिरे, शैलेंद्र मोरे, महेंद्र कांबळे, सचिन साठे, श्रीनाथ कांबळे उपस्थित होते.
आंदोलनातील प्रमुख मागण्या –
१) घोरावाडी (शेलारवाडी), बेडसे, कार्ला, भाजे, पाटण, बौद्ध लेणी पुणे-मुंबई महामार्गांवर त्वरित दिशादर्शक फलक लावण्यात यावेत.
२) येळघोल, शिरवळ, तसेच कराड तालुक्यातील दुर्लक्षित बौद्ध लेणी संरक्षित तथा संवर्धीत कराव्यात.
३) जुन्नर तालुक्यातील अंबा अंबिका भीमाशंकर भूत लेणी यांना – – जोडणारा उत्कृष्ट दर्जाचा रस्ता, बनविण्यात यावा तसेच विजेची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवावी.
४) भंडारा डोंगर (सुदुंबरे गांव) देहूरोड बौद्ध लेणी अतिक्रमण काढून तेथील प्राचीन बौद्ध स्तुपाचे संवर्धन, तथा येण्याजाण्यासाठी रस्ता व विजेचे पथदिवे उभारण्यात यावेत.
५) कोंडाणे लेणी कर्जत येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते त्यामुळे लेणीची मोठया प्रमाणात पडझड होत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी.
६) जुन्नर तालुक्यातील सुलेमान टेकडीवर असणाऱ्या बौद्ध लेणीस जाण्यासाठी रस्ता नसल्याने, अभ्यासक पर्यटक यांची गैरसोय होत आहे आणि सद्यस्थितीत लेणीवर जाणे जीवावर बेतू शकते या साठी तेथे स्वतंत्र्य रस्ता आणि संरक्षण कठडे उभारण्यात यावेत.
७) प्राचीन बौद्ध वारसा व त्याचा अभ्यास जनसामान्यास कळण्यासाठी संरक्षित लेणीवर पुरातत्व खात्यामार्फत प्रशिक्षित गाईड (अभ्यासक) नेमण्यात यावेत.
८) प्राचीन जंबूव्दिपातील (भारतातील) सर्वात मोठा स्तूप असणारी कार्ला बौद्ध लेणी आणि तिच्यावर असणारी बौद्ध समाजाची आस्था लक्षात घेता येथे दोन समाजात अज्ञानाने उदभवणारे वाद आणि लेणी संदर्भातील अतिक्रमित बाबी यांवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात याव्यात जेणे करून दोन्ही समाज बांधवात प्रेम भावना निर्माण होण्यास मदत होईल.
९) बौद्ध अनुयायी, अभ्यासक, पर्यटक यांना सुरक्षा रक्षकांच्या अरेरावीचा नेहमीच सामना करावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही गटात नेहमी वाद होताना दिसतात ते थांबवण्यासाठी खाजगी कंपनीला दिलेले टेंडर काढून पुरातत्व खात्याने स्वतःचे सुरक्षा रक्षक नेमावेत.
१०) प्रत्येक लेणीवर पिण्याचे पाणी, विज (लाईट), स्वच्छता गृह, पार्किंग व्यवस्था करण्यात यावी.
११) विविध लेणींवर असणारे शिलालेख तसेच प्राचीन शिल्प जतन करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी.
१२) अवघड-अती उंचीवर असणाऱ्या लेणी पाहण्यास जाणाऱ्या पर्यटक आणि वृद्धांसाठी रोप-वे ची सुविधा सुरु करण्यात यावी.
१३) कार्ला, भाजे, बडसे या बौद्ध लेण्यांचा वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समावेश करणे.
सदर मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास लोकशाहीने दिलेल्या अधिकारामुळे पुढील दिवसांत आपल्या कार्यालयासमोर व राज्यभरात उग्र आंदोलन करू असा ईशारा यावेळी देण्यात आला .या आंदोलनात मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी सेव बुद्धा केव अँड हेरिटेज या संस्थेच्या वतीने करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भारताचा कोहिनूर हरपला ! प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Industrialist Ratan Tata Dies
– मोठी बातमी ! इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन
– वंदन दुर्गांना । मूकबधिर लेकीसाठी ‘ती’ बनली आशा अन् दिशा ; मातृत्वाचा ‘प्रेरणा’दायी अध्याय लिहिणाऱ्या डॉ. उज्वलाताई । Dr. Ujjwala Sahane