Dainik Maval News : प्रतिनिधी – संध्या नांगरे : ती अतिशय मन लावून गाणं शिकली. शास्त्रीय संगीतात पदवी मिळवून ती उत्तम गायिका बनली. विवाहानंतरही पतीच्या प्रोत्साहनानं तिची गायन क्षेत्रातील कारकीर्द फुलत होती. पण अचानक पतीचं अपघाती निधन झालं आणि तीचं सगळं आयुष्यच सुकून गेल्यासारखं झालं. या हतबल परिस्थितीत तिच्या गायनानंच तिच्या जीवनाला नवसंजीवनी दिली… गायनाचे वर्ग घेत आणि मैफली गाजवत तिनं घर चालवलं, मुलाला शिक्षण देऊन मोठं केलं आणि स्वतःचीही गायन कारकीर्द घडवली. अशी ही संगीताला वाहून घेतलेली आपली आजची दुर्गा म्हणजे गायिका मंजुश्री दिवाण (वय ५६). अलिकडच पुनर्विवाह करुन मंजुश्रीताई एका पोरक्या बाप-लेकाचा आधार बनली आहे, हेही कौतुकास्पद आहे.
मंजुश्रीताई चिंचवडच्या आहेत. त्यांचं माहेर आणि सासर चिंचवड आहे. ताईंचं प्राथमिक शिक्षण गीतामंदिर विद्यालयात आणि माध्यमिक शिक्षण जैन कन्या प्रशालेमध्ये झालं. इयत्ता सहावी-सातवीत असताना सहजच ज्येष्ठ गायिका जयश्री लेले यांच्याकडं ताईंचं शास्त्रीय गायनाचं शिक्षण सुरु झालं, गायनाच्या काही परीक्षाही दिल्या. शाळेत असताना शिक्षिका नलिनी गोखले त्यांनी छोट्या मंजुश्रीचं गायन कौशल्य हेरुन “मंजु फार छान गाते, ती मोठी होऊन गायिका होऊ शकेल, संगीत क्षेत्रात काही करु शकेल.” असं तिच्या आईला आवर्जून सांगितलं होतं. तेव्हाच कुठंतरी मंजुश्रीताईंच्या मोठेपणीच्या वाटचालीसाठी किंचितशी दिशा मिळाली होती आणि झालंही तसंच मंजुश्रीताईंनी पुण्यात एसएनडीटी महाविद्यालयातून सन १९९२ ला शास्त्रीय संगीतात पदवी (B.A.) मिळवली. त्यानंतर पदव्युत्तर पदवीही (M.A.) पूर्ण केली. गजानन वाटवे व यशवंत देव यांच्याकडे सुगम संगीताचं प्रशिक्षण ताईंनी घेतलं.
चिंचवडगावातील ‘संगीत साधना गायन समूहा’च्या कार्यक्रमात मंजुश्रीताईंना पहिलं व्यासपीठ मिळालं. त्यांनी भावगीतं सादर करून रसिकांची मनं जिंकली होती. याच ठिकाणी निवेदक सतीश दिवाण यांच्याशी ताईंची भेट झाली आणि या भेटीचं रूपातर मैत्रीत, प्रेमात व मग विवाहात झालं. सन १९९६ मध्ये सतीश यांच्याशी त्यांनी विवाह केला. पेशानं अभियंता असलेले सतीश हे शहरातील नावाजलेले निवेदक होते, त्यांना साहित्य-कला-संगीताची आवड होती. त्यामुळं विवाहानंतरही मंजुश्रीताईंची गायनातील कारकिर्द बहरतच राहिली. ‘स्वरांगण’ समूहामध्ये गात असताना ‘तुझे रुप चित्ती राहो’ हा कार्यक्रम फार गाजला व या कार्यक्रमानं ताईंना स्वतःची ओळख मिळाली. पुढं विविध व्यासपीठावर ताई आपली गायनसेवा देत राहिल्या.
सन २००० मध्ये मंजुश्रीताईंनी स्वतःच्या ‘वाघेश्वरी संगीत विघालयाची’ सुरवात झाली. गायनाचे वर्ग घ्यायचं ताईंनी कधी ठरवलं नव्हतं. त्यांच्या मधुर स्वरांनी प्रभावित होऊन अनेकांनी ताईंना गाणं शिकवण्याची विनंती केली व घरीच संगीत विद्यालयाची सुरवात झाली. प्रारंभी ताईंनी आपल्या संगीत वर्गाला नावही दिलं नव्हतं, हे नाव ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांनी कौतुकानं दिलं आहे. ताईंच्या संगीत विद्यालयाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अनेक गायक ताईंनी घडवले. शास्त्रीय व सुगम दोन्ही प्रकार मंजुश्रीताई आपल्या संगीत विद्यालयात शिकवतात, संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचं मार्गदर्शन आयोजित करतात. आई-वडील आणि सासू-सासरे यांच्या सततच्या प्रोत्साहनानं व सहकार्यामुळं ताईंची वाटचाल सुकरपणे होत राहिली.
सर्वकाही छान चालले असताना सन २०१२ मध्ये ताईंचे पती सतीश यांचं अपघाती निधन झालं. एकाएकी झालेला हा आघात सहन करणं प्रचंड अवघड होतं. मोठ्या मुश्किलीनं काळजावर दगड ठेवून त्या या दुःखातून सावरल्या. कारण, मुलाला मोठं करण्याची, घडवण्याची जबाबदारी आता एकट्या ताईंवर आली होती. तेव्हा मुलगा सातवीत होता. खचून गेलेल्या या परिस्थितीत ताईंचं गायन हेच प्रामुख्यानं त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं होतं. नोकरीसाठी बोलावणं आलं होतं पण ताईंनी गायनालाच निवडलं. गायनाचे कार्यक्रम आणि संगीत विद्यालय या आधारावरच मंजुश्रीताई पुढंची वाटचाल एकटीनं यशस्वीपणे करत राहिल्या, मुलाला उत्तम शिक्षण त्यांनी दिलं.
दिवसभर तीन-तीन सत्रात, अतिशय शिस्तीत ताईंचे गायनवर्ग सुरु असायचे, हे वर्गच त्यांची नोकरी झाले होते. काहीकाळ ताईंनी ज्ञानप्रबोधिनी विघालयातही नोकरी केली. एकटीनं सर्व करताना मुलगा अद्वैतनं आईला समजूतदारपणानं सहकार्य केलं, मदत केली. गायनानं ताईंना दुःखातून बाहेर काढलं आणि आयुष्यात एकटीनं लढायला साथ दिली. गायनानंच ताईंना मायेच्या मैत्रिणी दिल्या आणि आता मंजुश्रीताईंचा आप्तपरिवार खूप मोठा झालाय.
सन २०१७ मध्ये मंजुश्रीताईंनी उद्योजक अनिल वेल्हाणकर यांच्याशी पुनर्विवाह केला आहे. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं दोघांनी विचारपूर्वक विवाहाचा निर्णय घेतला. कुटुंबियांनीही साथ दिली. दोन्ही मुलांना आता आई-बाबा मिळाले आहेत. लवकरच ताईंना मोठा मुलगा अथर्वच्या विवाहाची जबाबदारी पार पाडायची आहे. मंजुश्रीताईंच्या पुनर्विवाहामुळं आता एक नवं कुटुंब तयार होऊन ते भक्कम झालं आहे. मात्र, दिवंगत पती सतीश यांच्या आठवणी कायम सर्वांसोबत राहाव्यात म्हणून विघ्नहरी देव, संजय गोसावी व ताईंनी निवेदकांसाठी पुरस्कार जाहीर केला आहे. दरवर्षी शब्दमैफल कार्यक्रमात उत्कृष्ट निवेदकास हा पुरस्कार दिला जातो. मंजुश्रीताईंचा हा कलासक्त जीवनप्रवास ‘कला ही व्यक्तीला आनंदात आणि दु:खातही भक्कम साथ देते. म्हणून कला जोपासा.’ हेच शिकवणारा आहे. गायिका मंजुश्रीताई म्हणजे एक प्रारंभ दुर्गारूपच आहेत.
मंजुश्रीताई म्हणतात, “गायन आणि संगीत माझा श्वास आहे. स्वरसाधनेमुळंच मी पतीच्या निधनाच्या दु:खातून बाहेर पडू शकले. संकटाचा तोंड देण्यासाठी कलेची मला ताकद मिळाली. भविष्यात सुसज्ज संगीत विद्यालय उभारण्याचा व सुगम संगीत संमेलन घेण्याचा माझा मानस आहे.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अभिवादन नवदुर्गा : ‘दैनिक मावळ’च्या नवदुर्गा – 2023
1. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची…
2. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
3. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल
4. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
5. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास
6. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
7. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
8. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी
9. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी