Dainik Maval News : मावळ तालुक्याच्या राजकारणात आज, बुधवारी (दि.23) मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. आज दुपारी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांची पहिली यादी समोर आली, तेव्हा त्यात आमदार सुनिल शेळके यांनाच मावळ विधानसभेतून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याचे समोर आले. त्यानंतर राष्ट्रवादीतील अन्य इच्छुक बापूसाहेब भेगडे यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावून आपण पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. बापूसाहेब भेगडे यांच्यासारख्या पक्षाच्या जुण्या जाणत्या नेत्याने पदाचा राजीनामा दिल्याने मावळात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.
मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याचे काम बापू भेगडे यांनी मागील ३० वर्षांत केले. पक्षाचे एकनिष्ठ अशी त्यांची ओळख आहे. त्याच जोरावर २००९ च्या विधानसभेत त्यांना पक्षाने तिकीट जाहीर केले. तेव्हा बाळा भेगडे यांच्याकडून थोड्याफार मताने त्यांचा पराभव झाला. यानंतरही ते पक्षात कार्यरत राहिले. साखर कारखाना, सहकारी संस्था यातून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु ठेवली. २०१९ साली पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून बापू भेगडे उमेदवारीसाठी चर्चेत आले. परंतु ऐनवेळी सुनील शेळकेंना उमेदवारी जाहीर झाली आणि बापूंनी माघार घेतली. आताही २०२४ साठी बापूसाहेब भेगडे पक्षाकडून उमेदवारी मागत होते. मात्र तालुक्यातील बदललेला नूर पाहून पक्षाने सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. आणि तिकीट डावलल्यामुळे बापूसाहेब भेगडे यांनी अखेर पदाचा राजीनामा देत अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले.