Dainik Maval News : सभागृहातील सदस्य राज्यातील जनतेचे प्रतीक असून जनतेच्या आशा आकांक्षा व्यक्त करणारे हे सभागृह आहे. सभागृहाच्या वेळेचा राज्यातील जनतेच्या हितासाठी आणि न्यायासाठी उपयोग करून, जनतेला न्याय देण्यासाठी कार्य करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले.
विधानसभेत 15 व्या विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबदल सर्वांचे आभार मानत नार्वेकर म्हणाले, सदस्यांनी सभागृहात असताना समाजाच्या विकासाचा आणि समाजात वावरत असताना सभागृहाचा विचार डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. सभागृहाचे कामकाज अधिक प्रभावी होण्यासाठी चतुसूत्री कार्यक्रम राबविण्यात येईल. सभागृहात सदस्यांना आपापल्या विधानसभा मतदारसंघातील समस्या मांडण्यासाठी प्रश्नोत्तराच्या तासाचे विशेष महत्व आहे. समिती पद्धती हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे, तर कायदा निर्मिती हे विधानमंडळाचे अंगीभूत महत्वाचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांची 15 व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या नावाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. या प्रस्तावास सदस्य सर्वश्री अनिल पाटील, ॲड. आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी ॲड.राहुल नार्वेकर यांच्या नावाचा विधानसभा अध्यक्ष पदासाठीचा प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली. ॲड.राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.
ॲड. राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा सदस्य सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले, जयंत पाटील, नितीन राऊत हे ॲड. नार्वेकर यांना अध्यक्षपदी स्थानापन्न होण्यासाठी अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेऊन गेले. सभागृहातील सर्व सदस्यांनी ॲड. नार्वेकर यांचे अभिनंदन केले.
राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे कल्याणकारी संकल्पनेची प्रभावी अभिव्यक्ती आहे. सदस्यांना अर्थसंकल्पावरील चर्चा करण्यासाठी पुरेसा अवधी देऊन, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वानी कार्य करून विधिमंडळ कामकाज करत असताना दोन्ही बाजूंचे सहकार्य आवश्यक असल्याची अपेक्षाही नार्वेकर यांनी व्यक्त केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे तळेगाव नगरपरिषदेचे लक्ष्य । Talegaon Nagar Parishad
– लगीनसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांना मागणी वाढली ; फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस
– युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश ; खासदार श्रीरंग बारणे यांनी केले स्वागत । Maval Lok Sabha