Dainik Maval News : नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील हॉटेल्स, व्हिला, बंगले, टेंट हाऊसची बुकिंग केली आहे. बहुतांश हॉटेल्सची समाधानकारक बुकिंग झाली असून सेकंड होम असलेले बंगले व जलाशयांच्या किनाऱ्यांवर असलेल्या कृषीपर्यटन केंद्रावरील टेंटची बुकिंग हाऊसफुल्ल झाली आहे. एकीकडे ही तयारी होत असताना नववर्षाच्या स्वागताच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी धांगडधिंगा, हुल्लडबाजी आणि गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने यांनी दिला आहे.
यंदा विकेंड, पुन्हा सोमवार वगळता थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचा पहिला दिवस अशी प्रदीर्घ सुटी असल्याने लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटननगरी लोणावळा, खंडाळ्यासह मावळातील सर्वच पर्यटनस्थळे सज्ज झाली आहेत. येथील हॉटेल्स, रिसॉर्ट, फार्म हाऊस, खाजगी बंगले, सेनेटोरियम व कृषीपर्यटन केंद्रावरील टेंटची बुकिंग हाऊसफुल्ल होऊ लागली आहे. पर्यटन स्थळांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल, पिंपरी-चिंचवड पोलीस दल सज्ज असून अतिरिक्त फौजफाटा मागविण्यात आला आहे.
पर्यटनस्थळांवर जाण्यास रात्रीच्या वेळी बंदी असल्याने कोणीही धोकादायकपणे भुशी धरणाच्या वरील डोंगरावर, टायगर, लायन्स पॉईंट्ससह गड किल्ल्यांवर जाण्याचा प्रयत्न करु नये. शहरात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे वर्तन करू नये. नववर्षाचे स्वागत हे उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली मद्य प्राशन करून धांगडधिंगा केला किंवा वाहने चालविल्यास नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीत होईल, असा इशाराच पोलीस प्रशासनाने दिला आहे.
मावळात छत्रपती शिवरायांचे ऐतिहासिक गड-किल्ले व प्राचीन लेण्या आहेत. अशा गडकिल्यांवर व लेण्याच्या ठिकाणी दारू पिण्यास सक्त मनाई आहे. सुटीच्या कालावधीत वरील ठिकाणी भारतीय पुरातन विभागाकडील अधिकारी, स्टाफ व पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. पर्यटकांनी देखील अशा ठिकाणी गैरवर्तन करणे टाळावे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची काही भरारी पथके तैनात केली आहेत. यामुळे रस्त्यावर दारू पिणे, विनापरवाना वाहने चालविणे, रात्री उशीरापर्यंत स्पिकर्स, ध्वनीक्षेपक सुरु ठेवणे अशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल ; दुपारी बारानंतर प्रवास करावा…
– मावळात होणार हरिनामाचा गजर ! कामशेत येथे एक जानेवारीपासून भव्य ‘कीर्तन महोत्सव’ – पाहा वेळापत्रक
– महाराष्ट्रात शुक्रवार – शनिवार दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज ; सोमवारपासून थंडी वाढणार