Dainik Maval News : प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज (दि.6) दीर्घ आजाराने निधन झाले, ते 74 वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. संझगिरी यांच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट विश्व हळहळ व्यक्त होत आहे.
पेशाने सिव्हिल इंजिनिअर असलेले संझगिरी मुंबई महानगरपालिकेत एका उच्च पदावर कार्यरत होते. पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातील त्यांच्या आवडीमुळे ते क्रिकेट समीक्षक बनले. मराठी क्रिकेट प्रेमींनी नेहमीच त्यांच्या क्रिकेटवरील लेखांचे काैतुक केले.
- त्यांच्या निधनाने क्रिकेट खेळाबाबत सखोल माहिती देणारा, त्यातील सौंदर्यस्थळे लेखणीने टिपणारा एक अवलिया माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि.7) शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
द्वारकानाथ सांझगिरी यांनी 1983 पासून सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धांचे वार्तांकन केले. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत. ( Dwarkanath Sanzgiri Passes Away Renowned Cricket Commentator and Author Dies at age 74 )