Dainik Maval News : वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल मिथुन धेंडे यांचा मंगळवारी (दि. १३ मे) कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. एका भरधाव वेगातील कंटेनर चालकाने मिथुन धेंडे यांना ठोकर मारून गंभीर जखमी करून निघून गेला आणि गंभीर जखमी झालेल्या मिथुन धेंडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. परंतु अटकेनंतर पोलीस तपासात घटना घडतानाची माहिती समोर आली आहे. ( Vadgaon hit and run case )
नेमकं काय घडलं होतं?
पोलीस निरिक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मिथुन धेंडे हे मंगळवार (१३ मे) रोजी वडगाव फाटा येथे वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. तसेच वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे एपीआय शीतलकुमार डोईजड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत होते. अक्षय पॅलेस, वडगाव कमानी जवळ त्याना मुंबई बाजूकडून तळेगाव बाजूकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी माहिती दिली की, कंटेनर (वाहन क्रमांक एचआर ७४ बी ३६७७) चा चालक अतिशय धोकादायकरित्या वाहन चालवित असून त्याला जर तत्काळ थांबवले नाहीतर तो खूप मोठा अपघात करून निष्पाप नागरिकांचे बळी घेवू शकतो.
सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शासकीय वाहनावरील चालक गणपत होले यांनी सदरची माहिती कॉल करून तिथून पुढे १ किमी अंतरावर वडगाव नाका येथे वाहतूक नियमनाचे काम करीत असणारे हेड कॉन्स्टेबल धेंडे यांना दिली. त्यावरून धेंडे यांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी तत्काळ त्यांच्या सोबतच्या ट्रॅफिक वार्डन आणि नागरिकांच्या मदतीने सदर वाहन मुंबई-चाकन लेनवर पुजा हॉटलच्या समोर थांबविले. ( police officer Mithun Dhende dies in container collision )
त्यावेळी सदर वाहनातील चालक ‘निचे आता हूँ’ असे बोलला. सदर वाहन थांबले असल्याने हेड कॉन्स्टेबल धेंडे हे त्या वाहनाच्या पुढे डाव्या बाजूला उभे असताना अचानक सदर वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अतिशय वेगाने चालवून धेंडे हे पुढे उभे असताना त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ठोकर मारून जखमी करून चाकण बाजूकडे निघून गेला. त्यांनतर हेड कॉन्स्टेबल धेंडे यांना तत्काळ उपचारासाठी पवना हॉस्पिटल येथे भरती केले असता, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी वाहन चालकाविरोधात कुंडलिक पंढरीनाथ सुतार (वय ४०, ट्राफिक वॉर्डन, रा. मु. आढे, पोस्ट. उर्से, ता. मावळ) यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. १६३/२०२५ बी.एन.एस. कलम १०३(१), २८१, सह मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७७, १८३, १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
आरोपींना अटक…
गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक गोष्टींच्या आधारे तपास करून गुन्ह्यातील वाहन आणि आरोपी यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिलीमकर यांच्या पथकाने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.
गुन्ह्यातील आरोपींची नावे रोहन इसब खान (वय २४, ड्रायव्हर, रा. ग्राम सिंगार, तहसील. पुनाना, जि. मेवात, हरियाणा) आणि उमर दिन मोहम्मद (वय 19 वर्षे, क्लिनर, रा. ग्राम बरसाना, तहसील. छाता, राज्य उत्तर प्रदेश) अशी असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत.
शासकीय इतमामात धेंडे यांच्यावर अंत्यसंस्कार
दिनांक १४ मे रोजी धेंडे यांचा वाढदिवस होता. मात्र आदल्या दिवशी रात्रीच त्यांना मृत्यूने गाठले. याबद्दल पोलीस दलात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे ग्रामीणच्या पोलीस जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुळच्या उरुळी कांचन येथील असलेल्या मयत मिथून धेंडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार असून धेंडे हे वडगाव मावळ पोलीस ठाण्यात मनमिळाऊ कर्मचारी म्हणून सर्वश्रुत होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई