Dainik Maval News : मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्यभरात गेल्या महिन्याभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पवना धरण देखील 75 टक्क्यांहून अधिक भरलेले असून धरणातून चार दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अशात भर पावसात आणि धरण 75 टक्क्यांच्या वर भरलेले असताना प्रशासनाने धरणाच्या सांडव्यावरील डागडुजीचे काम हाती घेतले.
- भली मोठी जाड क्रेन मशीन आणि त्यावरील ८ ते १० कर्मचारी धरणाच्या सांडव्यावर उभे राहून सांडव्याच्या बकेट ला येण्या जाण्यासाठी पायऱ्यांचे काम धोकादायक पद्धतीने करीत होते. यावेळी धरणाखालील क्षेत्रातील नागरिकांमध्ये धरणाचे दरवाजे बिघडल्याची अफवा पसरली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मुळात धरणाच्या सांडव्यावरील हे डागडुजीचे काम शाखा अभियंता यांनी जून महिन्याच्या आधी अर्थात एप्रिल – मे महिन्यात करून घेणे अपेक्षित होते. परंतु ते तेव्हा न होता आता ऐन पावसाळ्यात आणि धरण 75 टक्क्यांवर भरलेले असताना धोकादायक पद्धतीने करण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी होत आहे.
मे महिन्यामध्ये पावसाचा अंदाज घेऊन धरणाच्या डागडुजीचे छोटे-मोठे काम पूर्ण करून घ्यायला हवे होते. मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मे महिन्यात काम पूर्ण न झाल्याने हे काम ऐन पावसाळ्यात व पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर धोकादायक पद्धतीने केल्यामुळे सर्वत्र आश्चर्य, नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. काम सुरू असताना नागरिकांमध्ये धरणाचे दरवाजा उघडत नसल्याची अफवा पसरून घबराट पसरली होती. अधिकाऱ्यांची चूक आणि नागरिकांची काळजी पहायला मिळाली. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पवना धरण सांडव्यावर जे काम करण्यात आले, ते मे महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे होते. परंतु ते काम तेव्हा पूर्ण न झाल्याने सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने सुरू केले. – माणिक शिंदे, उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे