Dainik Maval News : “दिवंगत मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन मोठे काम उभारले व समृद्ध जीवन जगले,” अशा शब्दांत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
- दिवंगत कृष्णराव भेगडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री पाटील शुक्रवार (दि. ११ जुलै) रोजी दुपारी ४:३० वा. तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या निवासस्थानी भेटीस आले. यावेळी त्यांनी दिवंगत भेगडे यांची कन्या राजश्री म्हस्के (भेगडे), जावई राजेश म्हस्के, नात रिद्धी आणि पुतणे आनंद दादा भेगडे यांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच भेगडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
या भेटीवेळी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, मावळ तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष संदीप काकडे, चिराग खांडगे, समीर कोयते आदी मान्यवर उपस्थित होते.
- दिवंगत भेगडे यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केल्याची आठवण यावेळी मंत्री पाटील यांनी करून दिली. त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी नमूद केले.