Dainik Maval News : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येत असून महसूल विभागाने लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतीमान पद्धतीने विकासकामे वेळेत मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय आयुक्तालय येथे महसूल सप्ताहाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे, बापुसाहेब पठारे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते.
अधिकारी-कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देवून अजित पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून महसूल विभाग हा महत्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. हा विभाग प्रशासनाचा कणा म्हणून कार्यरत आहे. अतिवृष्टी, पुरपरिस्थिती, नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल विभाग नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत असतो. इतर विभागांनाही सोबत घेवून लोककल्याणकारी योजना, ध्येयधोरणे, उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावी करण्यासोबतच प्रशासकीय गतिमानता आण्याकरिता महसूल विभागाने काम करावे.
सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा –
महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत. महसूल सप्ताहामध्ये सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले कामे करावे. राज्य शासनाच्यावतीने १०० दिवसाचा कृती कार्यक्रम राबविण्यात आला, आता १५० दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे, यामध्ये उत्सूर्फपणे सहभाग होवून कामे करावीत, असेही अजित पवार म्हणाले.
याप्रसंगी अजित पवार यांच्या हस्ते विभाग आणि जिल्हास्तरीय उत्कृष्ट काम करणाऱ्या तसेच विविध खेळात प्राविण्य मिळालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महसूल विभागाच्या कामकाज आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच कार्यक्रमापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
दिनांक 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान पार पडणार महसूल सप्ताह :
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी येत्या १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
महसूल विभागामार्फत राज्यात १ ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच १ ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ, २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
३ ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, ४ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ प्रत्येक मंडळनिहाय राबविणे, ५ ऑगस्ट रोजी विशेष साहाय्य योजनेतील थेट लाभ हस्तांतरणय (डीबीटी) न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे;
६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व ती अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे आणि ७ ऑगस्ट रोजी एम-सँड (M-Sand) धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे याबाबत कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न