Dainik Maval News : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) वरील बोरघाट भागात जड-अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. याठिकाणी वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. पुढील आदेश जारी होत नाही तोवर ही बंदी लागू राहणार आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४८) बोरघाट या महामार्गावर जड-अवजड वाहतुकीमुळे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून या अधिसूचनेच्या दिनांकापासून ते पुढील आदेश होईपर्यंत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४८) बोरघाट या महामार्गावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांची वाहतूक बंदी करणेबाबत या अधिसूचनेव्दारे आदेश पारित करीत असल्याचे, जिल्हादंडाधिकारी रायगड किशन जावळे यांनी प्रसिद्ध केले आहे.
अवजड वाहनामुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात वारंवार अपघात होतात. रायगडच्या पोलीस अधिकक्षांनी बोरघाट परिसरात होणाऱ्या अवजड वाहनांच्या अपघातांचा अभ्यास करून यामागील कारणांचा शोध घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना बोरघाट परिसरात अवजड वाहनांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार हे आदेश काढण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) बोरघाट हा तीव्र चढउताराचा वाळणाचा रस्ता आहे. महामार्गावरील याच पट्ट्यात यापुर्वी अनेकदा अपघातांच्या घटना घडल्या आहेत. अपघातांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून उपाययोजना तसेच जनतेच्या सुरक्षिततेचे कारण पूढे करण्यात महामार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जावळे यांनी जारी केले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय – गुरुनाथ साठीलकर
“बोरघाटातील वाहतूक विनाअपघात होण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांनी घेतलेला अवजड वाहनांना बोरघाटात वाहतुकीस बंदी घालणारा निर्णय धाडसाचा आहे. नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया आणि एमएसआरडीसी चे वाहतूक धोरण आणि महामार्गावर वाहन चालकाना सोसावा लागणारा वाढीव टोलचा भुर्दंड यातून मार्ग काढत सोयीचा मार्ग म्हणून वाहन चालक जुन्या मुंबई पुणे महामार्गावर (NH 48) बोरघाटातील वळणावळणाचा आणि तीव्र चढणीचा मार्ग अवलंबतात. यामुळे बोरघाट पट्ट्यात वाहनांच्या अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात असतात.
याबाबींचा अभ्यास करून खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका आंचल दलाल आणि जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्यासोबत समन्वय साधून अपघातांना नियंत्रित करण्यासाठी बोर घाटातील अवजड वाहतुकीस बंदी आणण्याचा निर्णय पारित केला आहे. हा धडाडीचा निर्णय कार्यान्वित करण्यासाठी सुरुवातीच्या काही दिवसात महामार्ग वाहतूक यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेला खूप अडचणी येणार आहेत. तरी देखील सर्वांच्या सहकार्याने या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास नाहक जाणारे निष्पापांचे जीव वाचतील आणि अपघातांवर देखील नियंत्रण येईल हे निश्चित.
किंबहुना आजवर नाहक बळी पडलेल्या अनेक निष्पापाना ही भावपूर्ण श्रद्धांजली आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. हेल्प फाउंडेशन देखील सर्वार्थाने या निर्णयासोबत असणार आहे. अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी घेतलेला पुढाकार खरोखर प्रशंसनीय आहे.”

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारणीस मंत्रिमंडळ समितीची मान्यता
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध ; हरकती व सूचनांसाठी ३१ तारखेपर्यंत मुदत । Talegaon Dabhade
– पुणेकरांना वाहतूककोंडीतून अल्प दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण
