Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील नागरिकांना ‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (एबी-पीएमजेएवाय) आणि ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने’चा (एमजेपीजेएवाय) लाभ मिळावा यासाठी ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ तयार करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्यानुसार कार्ड तयार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने’मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील. अंगीकृत रुग्णालयांमध्ये या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. यामध्ये १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील वयोवृद्ध ७० वर्ष वरील सदस्यांना अतिरिक्त प्रतीवर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड’च्या माध्यमातून देणे शक्य होईल.
या योजनेअंतर्गत लाभार्थीला प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळविण्याकरिता आयुष्मान भारत गोल्डन कार्ड (एबी-पीएमजेएवाय कार्ड) कुटंबातील सर्व सदस्यांकडे असणे बंधनकारक आहे.
शासनाने हे कार्ड बनविणे अंत्यत सोपे केलेले आहे. लाभार्थ्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोरमधून ‘आयुष्मान ॲप’ डाउनलोड करून त्यावर किंवा https://beneficiary.nha.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर आयुष्मान भारत गोल्ड कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करता येईल.
लाभार्थी स्वतः ‘आयुष्मान ॲप’वरून किंवा संकेतस्थळाला भेट देऊन कार्ड तयार करून घेऊ शकतात. तसेच आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार (राशन दुकानदार) यांच्या माध्यमातूनही सदर कार्ड तयार करण्याची प्रक्रिया करता येईल. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेंतर्गत आपले व इतर इतर नागरिकांचे कार्ड काढण्याकरिता सहकार्य करावे व मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे मावळातील भात पिके तरारली, शेतकरी आनंदीत । Maval News
– मोठा निर्णय ! एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
– आता शेतात पोहचणे झाले सोपे, मावळातील ३० वादग्रस्त रस्ते खुले करण्यात प्रशासनाला यश । Maval Taluka