Dainik Maval News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांपूर्वी नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशात शहरी भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
अशात तळेगाव दाभाडे शहरात युती – आघाडीचे चित्र स्पष्ट नसताना आमदार सुनील शेळके यांनी मात्र एका उमेदवाराच्या नावाची जवळपास घोषणा करून नवीन राजकीय चाल केली आहे. आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पहिल्या उमेदवाराची घोषणा केली असून प्रभाग क्रमांक ७ मधून सत्यम गणेश खांडगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या घोषणेमुळे आमदार शेळकेंकडून आगामी निवडणुकीत तरूणांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविती जात आहे.
नवरात्रोत्सव काळात महिलांसाठी आयोजित भव्य लकी ड्रॉ कूपन स्पर्धेत शेकडो महिलांच्या उपस्थितीत आमदार सुनील शेळके यांनी ही घोषणा केली आहे. आमदार शेळके म्हणाले, “तळेगाव नगरपरिषदेला सुशिक्षित, अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व हवे. सत्यम खांडगे हे तरुण, कुशल व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व असून त्यांच्याकडून शहराला नवे भविष्य मिळेल.”
सत्यम खांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे चिरंजीव असून स्वतः यशस्वी उद्योजक आहेत. तसेच उच्च विद्याविभूषित अलून गोल्ड मेडलिस्ट आहेत. मामासाहेब खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट, खांडगे पतसंस्था आणि मामासाहेब खांडगे सीबीएसई स्कूल या संस्थांद्वारे ते सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत.
सत्यम खांडगे यांची उमेदवारी जाहीर होताच तळेगाव स्टेशन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेळके पुढे म्हणाले, “सत्यम खांडगे यांच्याकडे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्य आहे. ते नवे तंत्रज्ञान वापरून तळेगाव शहराच्या विकासात मोलाचे योगदान देतील. वडील गणेशशेठ खांडगे यांनी आशीर्वादाचा हात ठेवून तरुण नेतृत्वाला बळ दिले आहे.”
तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत तरुणांना संधी देण्याचा हा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीच्या धोरणाचा भाग असल्याचे बोलले जात असून आता या उमेदवारीनंतर इतर पक्ष काय भूमिका घेतात, तसेच पक्षातील अन्य इच्छुक काय भूमिका जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय