Dainik Maval News : बॉलिवूडचे ही-मॅन अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत देओल कुटुंबीयांकडून माध्यमांना अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण, अवघ्या अर्ध्या तासांतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली असून सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. ( Veteran Actor Dharmendra Passes Away )
अभिनेते धर्मेंद्र यांचा 8 डिसेंबर 2025 रोजी 90 वा वाढदिवस होता. परंतु नव्वदी गाठण्याआधीच त्यांना काळाने गाठले. यंदाच एप्रिल महिन्यात त्यांच्यावर डोळ्यांवर ग्राफ्ट ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतरही सातत्याने त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत होता. परंतु अभिनेते धर्मेंद्र देखील आजारावर मात करीत होते. मात्र आजअखेर त्यांची आजाराशी झुंज संपली, बॉलिवूडच्या या महानायकाने आज सर्वांचाच निरोप घेतला आहे.
भारतीय कला क्षेत्रात अभिनेते धर्मेंद्र यांचे नाव कायमच आदराने घेतले जाईल. आपल्या अस्सल अभिनयाच्या जोरावर त्यांनी एकापेक्षा एक भूमिका साकारल्या अन् अजरामर केल्या. धर्मेंद्रसिंग देओल हे त्यांचे मुळ नाव परंतू संपूर्ण सिनेविश्वास नव्हे तर जगभरात ते धर्मेंद्र याच नावाने प्रसिद्ध होते.
अभिनेते धर्मेंद्र यांनी सन 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी ‘अनपढ’, ‘बंदिनी’, ‘अनुपमा’, ‘आया सावन झूम के’ अशा चित्रपटांमध्ये उठावदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. पुढे धर्मेंद्र यांनी अॅक्शन आणि कॉमेडीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘शोले’, ‘धरम वीर’, ‘चुपके चुपके’, ‘मेरा गाँव मेरा देश’ आणि ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या दमदार आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. अलीकडेच ते शाहिद कपूर आणि कृति सेननच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात दिसले होते. त्यांचा पुढील चित्रपट ‘इक्कीस’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या करिअरमध्ये बलराज साहनी, राज कपूर, संजीव कुमार, अमिताभ बच्चन आणि अमरीश पुरी यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले. तसेच त्यांनी नवीन पिढीतील रणवीर सिंग, शाहिद कपूर, आलिया भट्ट यांसारख्या कलाकारांसोबतही स्क्रीन शेअर केली आहे. ‘बॉलिवूडचे ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले. अभिनयातील सहजता, करारी व्यक्तिमत्व आणि भावनिक अभिव्यक्ती यामुळे ते नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहतील.
अभिनेते धर्मेंद्र यांचे संपूर्ण कुटुंब अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. पत्नी हेमा मालिनी या देखील सिनेविश्वातील दिग्गज अभिनेत्री आहेत. सध्या त्या राजकारणात देखील सक्रीय आहेत. तर सनी देओल, बॉबी देओल ही दोन्ही मुले अभिनयात वेगळ्या उंचीवर आहेत. ईशा देओल हिने देखील सिनेक्षेत्रात नाव कमावले आहे. अभिनेते धर्मेंद्र हे काहीकाळ राजकारणात देखील सक्रीय होते, तसेच त्यांनी खासदार म्हणूनही काम केले आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांना त्यांच्या उज्वल कारकिर्दीसाठी आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अशा या महान नटाचे आज निधन झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधीपक्षनेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. तसेच कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय आदी सर्वच क्षेत्रातून अभिनेत धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे.
धर्मेंद्र अनंतात विलिन ;
धर्मेंद्र यांच्या जुहू येथील राहत्या घरात सोमवारी साधारणतः साडेबाराच्या सुमारास एक रुग्णवाहिका पोहोचली. त्यावेळी चाहत्यांच्या काळजाची धाकधूक वाढलेली. धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. त्यावेळी धर्मेंद्र यांच्या घरी नातेवाईकांची रांग लागली. धर्मेंद्र यांच्या मुलीही जुहूतल्या घरी पोहोचल्या. याच दरम्यान, धर्मेंद्र यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तेवढ्याच विले पार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीत हेमा मालिनी आणि ईशा देओल या दिसल्या. कुणाला काही कळण्यापूर्वीच सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यावरील अंत्यसंस्कार उरकण्यात आलेले. अवघ्या अर्ध्या तासांतच धर्मेंद्र यांचा थोरला लेक सनी देओलनं मुखाग्नी दिला आणि तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा बॉलिवूडचा ही-मॅन अनंतात विलिन झाला.
The passing of Dharmendra Ji marks the end of an era in Indian cinema. He was an iconic film personality, a phenomenal actor who brought charm and depth to every role he played. The manner in which he played diverse roles struck a chord with countless people. Dharmendra Ji was…
— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2025
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
