Dainik Maval News : कोकण आणि मावळ तालुक्यातून कार्तिकी वारीसाठी आळंदीला येणाऱ्या पायी दिंड्यांचे पुणे-मुंबई महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावी, या मागणीसाठी मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार महाराज भसे यांनी सांगितले.
कोकण विभागातून येणाऱ्या वारकरी दिंड्या या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करत असताना अनेकदा अपघात झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी कान्हे फाटा येथे एक मोठा अपघात झाला होता. तर यावर्षी कामशेत येथे अपघात झाला. या अपघातांमध्ये अनेक वारकरी मृत्युमुखी पडले आहेत. तर अनेक वारकरी जखमी झाले आहेत. हे वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी दिंड्यांना पोलिस संरक्षण मिळावे. तसेच ही कार्तिकी वारी आषाढी वारीच्या सोहळ्याप्रमाणे एकाच ठिकाणाहून सर्व दिंड्या एकत्रितपणे निघाव्यात यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामार्फत प्रयत्न करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष भसे यांनी सांगितले.
याबाबत मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वावरे, सचिव रामदास पडवळ, विश्वस्त बजरंग घारे, कार्याध्यक्ष संतोष कुंभार, शिवाजी पवार, कायदेशीर सल्लागार ॲड. सागर शेटे आदी पदाधिकाऱ्यांसह लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
