Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज ( दि. 23 ) पहाटे पाऊणे चारच्या सुमारास ताजे पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला. कंटेनर आणि कार मधील या अपघातात कंटेनर चालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजक ओलांडून पलीकडील मार्गिकेमध्ये घुसला. यावेळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या कारला कंटेनरची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे अतोनात नुकसान झाले.
अपघातात कंटेनर चालक अनुराग जगदीश गडवा (रा. चक्कर घट्टा, चंदौली, उत्तर प्रदेश) आणि मोटारीतील प्रवासी विवेक सुरेंद्र प्रतापसिंह (वय ३०, रा. फैजाबाद, उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारीतील शुभम शुक्ला (वय ३२, रा. खारघर, नवी मुंबई), ऋतुराज परमहंस जयस्वाल (वय ३२, रा. तुर्भे, मुंबई), अवधेश यादव (वय ३३) आणि कंटेनरमधील राहुल राजेंद्र यादव (वय २१, रा. वाराणसी) गंभीर जखमी झाले.
जखमींना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी मृत कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कामशेत पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले होते. अपघातामुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर आणि कार रस्त्याच्या कडेला हटविल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरूळीत करण्यात आली. हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला, अतिवेगामुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे झाला, हे तपासात समोर येईल.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade

