Dainik Maval News : मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. लोणावळा, तळेगाव आणि वडगाव नगरपालिकांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः लोणावळ्यात होत असलेल्या राजकीय घडामोडी सर्वाधिक चर्चेत आहे. परंतु या दरम्यानच माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केलेल्या एका आक्षेपार्ह विधानाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत असून यावर प्रतिक्रिया उमटत आहे.
भाजपाच्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुरेखा जाधव यांनी भाषणादरम्यान “मावळात आमचा आमदार नसला तरी आमदारांचा बाप म्हणजेच देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत आहे” असे विधान केले आहे. आपल्या भाषणात सुरेखा जाधव यांनी थेट आमदार सुनील शेळके यांचा बाप काढल्याने याबद्दल सर्वच स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे.
सुनील शेळके यांच्यावर वारंवार खालच्या पातळीवर टीका –
सुरेखा जाधव यांच्याकडून वारंवार आमदार सुनील शेळके यांच्यावर पातळी सोडून टीका होताना पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार, सुरेखा जाधव या आमदार सुनील शेळके यांचा वारंवार एकेरी उल्लेख करत असून, भाषणात वापरलेली भाषा “अत्यंत अशोभनीय आणि दूषित राजकारण करणारी” असल्याची टीका होत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, पराभव जवळ आल्याची चाहूल लागताच जाधव यांची जीभ अधिकच घसरू लागली आहे. युतीबाबत आदेश असूनही लोणावळ्यात त्यांची मनमानी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तालुक्यातील इतर ठिकाणांप्रमाणेच लोणावळ्यातही युती करण्याचे संकेत दिल्याचे सांगितले जाते. तरीदेखील सुरेखा जाधव यांनी मनमानी कारभार करत लोणावळ्यात युती न करता स्वतंत्र मार्ग अवलंबल्याने भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उसळली आहे.
अत्यंत आश्चर्यकारक बाब म्हणजे – भाजपने कमळाच्या चिन्हावर दिलेले काही उमेदवारच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत आहेत, ज्यामुळे सुरेखा जाधव यांची सत्ताकारणातील घडी कोलमडल्याचं दिसत आहे.
“स्त्री असल्याचा फायदा घेत टीका; उत्तर दिलं जात नाही” – कार्यकर्त्यांत चर्चा
स्थानिक पातळीवर अशी चर्चा रंगत आहे की – “सुरेखा जाधव यांना स्त्री असल्याचा फायदा मिळतो. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना समोरून तितकं उत्तर येत नाही, म्हणून त्या अधिकच खालच्या पातळीवर उतरल्या आहेत.” यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली असून, काही भागात वादाचे तणावपूर्ण वातावरण दिसू लागले आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांनी “युतीधर्म टिकला पाहिजे, कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम केलं पाहिजे” असा संदेश दिल्यानंतरही, लोणावळ्यात मात्र सुरेखा जाधव यांनी युतीला पूर्णतः डावलून स्वतंत्र रणनिती राबवल्याचं चित्र स्पष्ट आहे. आमदार सुनील शेळके यांना लोणावळा नगरपालिकेत नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तसेच इतर छोट्या-मोठ्या पक्षानी आमदार सुनील शेळके यांना या नगरपालिकेत पाठिंबा दिला असल्याने सुरेखा जाधव या काहीशा भयभीत झाल्यानेच त्या अशा प्रकारची टीका करत असल्याची चर्चा आता लोणावळ्यात रंगू लागली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
