Dainik Maval News : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मावळ तालुक्यात पुणे जिल्हा परिषद आणि मावळ पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मावळ तालुक्यात सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात प्रबळ पक्ष असून राष्ट्रवादीकडे जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीकडून आतापर्यंत पाच गटांपैकी दोन गट आणि दहा गणांपैकी तीन गणांतील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. परंतु उर्वरित तीन गट आणि सात गणांकरिता मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटाकडे धाव घेत आहेत. यातील काही इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून लाखो रुपये खर्च करून मोर्चेबांधणी केली आहे. तरीही अंतिम यादीत कुणाचे नाव येणार आणि कुणाचा पत्ता कट होणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा –
नुकत्याच झालेल्या लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा दिसून आला. यातील लोणावळा, वडगाव येथील निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढविली होती, तर तळेगावात भाजपा सोबत युती केली होती. परंतु निवडणुक अखेर सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा दिसून आला. अशात विजयी सुर असलेल्या राष्ट्रवादीच्या गोटात इच्छुकांची संख्या अपोआपच वाढली आहे.
आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर –
आजवर वेगवेगळ्या वेळी, ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आणि कोअर कमिटीच्या माध्यमातून पाच उमेदवार हे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद स्तरावर खडकाळा – कार्ला गटातून दीपाली दीपक हुलावळे, सोमाटणे-चांदखेड गटातून मनिषा नितीन मुन्हे आणि पंचायत समिती करिता टाकवे बुद्रूक गणातून प्राची देवा गायकवाड, सोमाटणे गणातून साहेबराव कारके आणि चांदखेड गणातून सुनीता मनोज येवले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
बंडखोरी होण्याची शक्यता –
दरम्यान राष्ट्रवादीकडे असलेली इच्छुकांची संख्या पाहता आणि जवळपास उर्वरित सर्वच गट आणि गणांत अनेक तुल्यबळ उमेदवार असल्याने पैकी काही गणांत उमेदवारांनी लाखो रुपये खर्चुन मोर्चेबांधणी करून ठेवलेली असल्याने ऐनवेळी पक्षाने तिकीट नाकारल्यास पक्षातून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पक्षश्रेष्टींनी बंडखोरीची शक्यता नाकारलेली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक