Dainik Maval News : ahmedabad plane crash : अहमदाबाद येथून उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाल्यानंतर विमानातील सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र आता गुजरात पोलिसांनी एक प्रवासी जिवंत आढळला असल्याचा दावा केला आहे. ४० वर्षीय रमेश विश्वासकुमार हे या भीषण अपघातामधून बचावले आहेत.
रमेश विश्वासकुमार हे सध्या उपचार घेत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच अपघातानंतर स्वतःच्या पायावर चालत जात असल्याचा त्यांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रमेश विश्वासकुमार हे एअर इंडियाच्या विमानाता ११अ या सीटवर बसले होते. त्यांचा बोर्डिंग पासही आता समोर आला आहे.
उर्वरित प्रवाशांचा मृत्यू ?
अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफनंतर अवघ्या पाच मिनिटांत अपघात झाला. या अपघातात २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत होती, परंतु एका प्रवासी जीवंत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आशा पल्लवीत झाल्या आहेत. आणखीन कुणी जीवंत असण्याची आशा व्यक्त केली जात आहे. परंतु सायंकाळी उशीरापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाची परिस्थिती पाहता उर्वरित २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मृत्यू
या विमानाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते. या अपघातात त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. या विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादी काही वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये १२ व्या नंबरवर विजय रमणिकलाल रुपाणी असं नाव आहे. २ डी हा त्यांचा सीट नंबर होता. त्यांचा विमानाचा बोर्डिंग पास व विमानात बसल्यानंतरचा एक फोटो समोर आला आहे. त्यामुळे विजय रुपाणी देखील या विमानात होते याची प्रसारमाध्यमांनी पुष्टी केली आहे.
अनेक मृतदेह जळून खाक, ओळख पटवणं कठीण
विमान अपघातामुळे मृतदेह जळून खाक झाले आहेत. अनेक मृतांची ओळख पटणं बाकी आहे. आता डीएनए टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवली जाईल. मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना बोलवून डीएनएद्वारे ओळख पटवली जाईल. गुजरातच्या आरोग्य सचिवांनी सांगितलं की अनेक मृतदेह असे आहेत ज्यांची ओळख पटवणं अगदीच कठीण झालं आहे.
नेमकी घटना काय?
अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारं विमान एआय-१७१ उड्डाणानंतर तीन मिनिटांनी विमानतळाच्या सीमेजवळ कोसळलं अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता उड्डाण केलेल्या बोइंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. त्यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, एक कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतात माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश । ahmedabad plane crash
– मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली
– शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर


