Dainik Maval News : वडगाव मावळ शहरातील केशवनगर भागात सोमवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एक जणावर गोळीबार केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असून यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे. दरम्यान, या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.
अभिजित राजाराम ओव्हाळ (वय 28 वर्ष, रा. सांगवी) रणजीत बाळासाहेब ओव्हाळ (वय 23 वर्ष, रा. सांगवी) आणि प्रथमेश सुरेश दिवे (वय 23, रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना मंगळवारी रात्री पाऊणे दहाच्या सुमारास अटक करण्यात आली. तर गुन्ह्यातील अन्य एक आरोपी सौरभ रोहिदास वाघमारे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
अक्षय एकनाथ मोहिते (वय २८, रा. पवारवस्ती, केशवनगर, वडगाव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. वडगावचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय मोहिते यांचा चुलत भाऊ हा वडगाव येथील एका शाळेत दहावीमध्ये शिकतो. त्याने अभिजित व रणजित यांच्या भावकीतील मुलीला शाळेतून तिच्या घरी सोडले. त्यावरून आरोपींनी त्याला शाळेच्या बाहेरून मोटारीमध्ये घेऊन मारहाण केली. त्यावरुन फिर्यादी व आरोपी यांच्यात बाचाबाची झाली.
त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अक्षय हा त्याच्या मित्रांसह केशवनगर येथील एकवीरा चौकात बसलेले असताना चारही आरोपी तेथे दुचाकीवरुन आले. सौरभ याने शिवीगाळ करून लगेच पिस्तुल बाहेर काढून ते अक्षयच्या दिशेने झाडले. परंतु त्यामधून गोळी निघाली नाही. अक्षय व त्याचे मित्र तिथून पळून जात असतानाच आरोपीने पुन्हा एकदा गोळी झाडली. परंतु अक्षयला गोळी लागली नाही. तो जवळच असलेल्या सोसायटीत जाऊन लपून बसला. त्यानंतर सर्व आरोपी तिथून दुचाकीवरुन पळून गेले.
पोलीस निरिक्षक कुमार कदम हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक, फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
