Dainik Maval News : मावळ तालुक्यातील दोन बाल गायिका कलाकारांची स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद’ या रियालिटी शोमध्ये निवड झाली आहे. दिनांक 13 जुलैपासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालेल्या ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद पर्व 3’ या संगीत स्पर्धेसाठी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील कलापिनीची बालकलाकार अवनी परांजपे आणि कामशेत येथील प्रसिद्ध गायिका मोनिका काकडे यांची कन्या स्वरा किंबहुने या दोघींची निवड झाली आहे.
अवनी परांजपे हिने गुरु अंजली कऱ्हाडकर यांच्याकडून गायनाचे धडे घेतले आहेत. ती केवळ 13 वर्षांची असून सध्या पुण्यातील भारती विद्या भवन शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. तर, स्वरा अजित किंबहुने ही मूळची बीड जिल्ह्यातील आहे. मात्र तिचे आजोळ मावळमधील कामशेत हे आहे. तिचे बालपण कामशेतमध्ये गेले आहे. सध्या तीचे कुटुंब पिंपरी-चिंचवड येथील रहाटणीमध्ये आहे. ( Avni Paranjpe and Swara Kimbhune in reality show in Star Pravah Me Honar Superstar )
स्वरा एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल शाळेत पाचव्या इयत्तेत शिकते, ती दहा वर्षांची आहे. स्वराचे प्रथम गुरु तिची आई मोनिका काकडे – किंबहुने आणि पुढील संगीत शिक्षण विदुषी अपूर्वा गोखले (ग्वाल्हेर घराणा) यांच्याकडे मागील 4 वर्षांपासून सुरू आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर संगीत स्पर्धेसाठी दोघींची निवड झाल्याबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.