Dainik Maval News : भाद्रपदी अमावास्या अर्थात भादवी बैलपोळा हा सर्जा-राजाचा सण मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांनी बुधवारी (दि.2) मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. यंदा मावळात दमदार पाऊस झाल्याने भातासह अन्य पिकेही जोमदार आली आहेत. त्यामुळे यंदाचा बैलपोळा सण शेतकऱ्यांनी अधिक उत्साहाने साजरा केला. टाकवे बुद्रुक गावात शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण साजरा केला.
टाकवे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला घरी गरम पाण्यानी अंघोळ घालून त्यांना शिंगाना सोनेरी, फुलांचे हार घातले, मोरखी,कवड्याच्या माळा, रंगीबेरंगी गोंडे, गुंगर माळ, चवराचे गोंडे घालून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला. गावातील शेतकऱ्यांनी डीजे, ढोल ताशे, बॅण्ड तुताऱ्या तसेच, गुलाल भंडाऱ्याची उधळण करत आपापल्या बैलांची मिरवणूक काढत ग्रामदेवताचे दर्शन घेतले.
बैलांना शिंगाला कपाळावरती नारळ बांधून गावातील ऐशी मधून पळवले. ह्या बैलांच्या कपाळावरील नारळ तोडण्यासाठी युवक मोठ्या प्रमाणावर ऐशी मध्ये उभे राहून नारळ तोडण्यासाठी आपले साहस दाखवत होते. तर अनेक सर्जा राजांनी त्यांच्या कपाळावरती बांधलेले नारळ तोडून दिले नाही. अशाप्रकारे टाकवे बुद्रुक सह आंदर मावळ मधील 40 ते 50 गावात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला.
बैलाच्या कपाळावरील नारळ तोडणाऱ्यांसाठी विशेष बक्षीस होते.
– सुरेश गणपत असवले यांच्या बैलाचा नारळ तोडणाऱ्यांसाठी 51,111 रुपये.
– ऋषीनाथ पांडुरंग शिंदे यांच्या बैलाचा नारळ तोडणाऱ्यांसाठी 11,111 रुपये.
– संतोष गबळू पिंगळे यांच्या बैलाचा नारळ तोडणाऱ्यांसाठी तोच बैल व त्या सहित दुसरा एक बैल असे दोन बैल या शेतकऱ्यांकडून अशी वेगवेळी बक्षीसे ठेवण्यात आली होती.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या पुन्हा रुजू होण्याला लोणावळा जागरुक नागरिक मंचचा विरोध !
– ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8 हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान, राज्य सरकारचा निर्णय
– सरकारच्या २ एकर जमीन वाटपाला पवना धरणग्रस्तांचा तीव्र विरोध, प्रत्येकी ४ एकरवर शेतकरी ठाम !