Dainik Maval News : निगडीतील भक्ती-शक्ती समुहशिल्प-किवळे-वाकड-पिंपळे सौदागर मार्गे चाकणपर्यंत जाणाऱ्या प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात. हा मार्ग ज्या रस्त्यावरून जाणार आहे, तिथे आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारता येईल का याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि मेट्रो प्रशासनाने अभ्यास करावा. त्यानुसार नियोजन करावे, अशी महत्वपूर्ण सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक, ट्रान्सपोर्ट नगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भुमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर (वायसीएमजवळ), गवळीमाता चौक, भोसरी एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण असा मेट्रो मार्ग असणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महा-मेट्रोकडून सादर करण्यात आला. त्याचे फुगेवाडी येथील कार्यालयात लोकप्रतिनिधीसमोर सादरीकरण करण्यात आले.
खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महापालिका आयुक्त शेखर सिंह, महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हर्डीकर यांनी संपूर्ण मार्गाची माहिती दिली.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, झपाट्याने वाढणारे शहर, भविष्याचा विचार करून भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्ग करण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले असून महा मेट्रोने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे. या मार्गाचे काम ज्या रस्त्यावर केले जाणार आहे, तिथे आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारता येईल का याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि मेट्रो प्रशासनाने अभ्यास करावा.
मार्गामुळे भविष्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. तीन बोगी (डबे) ऐवजी सहा बोगीची मेट्रो या मार्गावरून धावावी. त्यानुसार मार्गाचे नियोजन करावे. भोसरीतील पूल पाडून तो सलग करावा आणि मेट्रो मार्ग करावा. भविष्यात वाहतुकीला अडथळा ठरणार नाही असे नियोजन करावे. वाकड-चांदणी चौक ते खडकवासला हा मार्गही प्रस्तावित आहे. पुढे लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार आहे.
भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्पाला वेग आला आहे. मेट्रो प्रशासनाने लोकप्रतिनिधीना आराखड्याचे सादरीकरण केले. त्यात काही दुरुस्ती, सूचना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी मेट्रोने करावी. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अंतिम बैठक होईल. त्यानंतर मार्गाला अंतिम मंजुरी दिली जाईल. – श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ ; आता मिळणार ‘इतके’ पैसे
– वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजूरी ; इमारत बांधण्यासाठी १०९ कोटी ८ लक्ष निधीस मान्यता
– मोठी बातमी ! पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

