Dainik Maval News : पिंपरी चिंचवडमध्ये एका भयानक कटाचा पर्दाफाश झाला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संभाव्य हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. यासंदर्भात आमदार शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या सूचनेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचा निर्णय सात दिवसांत घेण्याची ग्वाही दिली. परंतु प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लगेचच एसआयटी स्थापन करण्यात आली
सात सराईत गुन्हेगार, नऊ पिस्तूल, ४२ जिवंत काडतुसे…
२६ जुलै २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडाविरोधी पथकाने गुप्त माहितीनुसार तळेगाव दाभाडे परिसरात मोठी कारवाई केली होती. यामध्ये सुरुवातीला दोन गुन्हेगार पकडण्यात आले. त्यानंतर तपासाचा विस्तार करत एकूण सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली, ज्यांच्याकडून नऊ पिस्तूल, ४२ जिवंत काडतुसे, कोयते अशा प्राणघातक शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला.
या गुन्हेगारांवर आधीच खून, खुनाचा प्रयत्न, जाळपोळ, खंडणी, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, लूट, तोडफोड असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुनील शेळके यांची हत्या करण्याचाच उद्देश
तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली – या गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर आमदार सुनील शेळके यांची हत्या करण्यासाठीच होणार होता, असा खुलासा त्यांच्याकडून जबाबामध्ये झाला आहे. हे आरोपी मध्यप्रदेश, जालना, वडगाव, काळेवाडी परिसरातले असून आमदार शेळके यांचे कोणतेही वैयक्तिक वैर त्यांच्याशी नव्हते. त्यामुळे या गुन्हेगारांच्या पाठीमागे कोणी शक्तिशाली सूत्रधार असल्याचा संशय शेळके यांनी विधानसभेत व्यक्त केला.
“कोण करतंय लाखो रुपयांची गुंतवणूक?” – आमदार शेळके यांचा सवाल
शेळके यांनी असे नमूद केले की, ही टोळी गरीब आणि सामान्य कुटुंबातील असूनही त्यांच्याकडे नऊ पिस्तूल, कोयते खरेदी करण्यासाठी लाखोंचा खर्च झाला. एवढेच नव्हे तर, ज्या नामांकित वकिलांनी आरोपींची बाजू घेतली त्यांच्या फीही लाखोंच्या घरात होती. मग या सगळ्यांमागे “हे पैसे कोण पुरवतंय?”, आणि “माझ्या हत्या कटामागचा सूत्रधार कोण?”, असा थेट सवाल शेळके यांनी उपस्थित केला.
तडीपार असूनही जिल्ह्यात वावर
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तरात सांगितले की, पकडलेले गुन्हेगार दीड वर्ष तुरुंगात होते. नंतर बेल मिळाल्यावर त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. मात्र, तडीपार असूनही हे गुन्हेगार पुणे जिल्ह्यात लपून येतात, असा आरोपही आमदार शेळके यांनी केला.
सखोल तपास होणार
या गंभीर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योगेश कदम यांनी विधानसभेत उत्तर देताना SIT नेमण्याचा निर्णय पुढील सात दिवसांत घेण्यात येईल, अशी घोषणा केली. परंतु प्रकरणाचे गांभीर्य पाहून लगेचच एसआयटी ची स्थापन करण्यात आली या सात गुन्हेगारांपैकी काहींना शस्त्र पुरवणारा “देवराज” नावाचा मध्यप्रदेशातील व्यक्ती असून त्याची माहितीही संबंधित राज्य सरकारला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात “कोण पैसे पुरवतं?”, “मूळ सूत्रधार कोण?”, याचा सखोल छडा लावण्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री कदम यांनी दिले.
ही घटना केवळ एका लोकप्रतिनिधीवर जीवघेणा हल्ला करण्याच्या कटापर्यंत मर्यादित न राहता, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही चिंतेची बाब ठरत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी-पवना नद्यांचे उगमापासून ते संगमापर्यंत शुद्धीकरण करण्यात येणार ; नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू
– पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 32 गावांना विकासात्मक न्याय देणार ; राज्य सरकारचे आश्वासन
– विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन । Pune News