Dainik Maval News : मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमधील अंतर कमी करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकची उभारणी करण्यात येत आहे. हा मिसिंग लिंक प्रकल्प जून 2025 मध्ये खुला करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार असून अपघात देखील कमी होण्यास मदत होणार आहे.
आशिया खंडातील सर्वाधिक उंच म्हणजे 180 मीटर उंचीच्या केबल ब्रिजवर सध्या स्लॅब टाकण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्णत्वास जाईल. त्यामुळे येत्या वर्षभरात पुणे – मुंबई ही दोन्ही शहरे आणखीन जवळ येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी व या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी 2019 मध्ये हा प्रकल्प हाती घेतला होता. आता या प्रकल्पाचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे.
एकूण 13.3 किमी लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्प हा राज्य सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत 1.67 किमी आणि 8.92 किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. तसेच आपत्कालीन एक्झिटसाठी 300 मीटरच्या अंतरावर बाहेर पडण्याचा मार्ग आहे. याशिवाय दरड कोसळू नये म्हणून ठिकठिकाणी रॉक बोल्ट लावण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पासाठी जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पाची खासियत म्हणजे सर्वात उंच पूल आणि रुंद बोगदा बांधण्यात येत आहे. हा बोगदा आशिया खंडातील सर्वात मोठा आणि रुंद बोगदा आहे. तर केबल-स्टेड पूल हा 650 मीटर लांबीचा असून या खांबाची उंची 180 मीटर आहे. खांबांमधील अंतर 305 मीटर आहे.
खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट हा सध्याचा 19 किमीचा एक्स्प्रेस वेवरील प्रवास ‘झिरो फॅटल इटी कॉरिडॉर’ बनविण्यासाठी आणि उतार व घाटाचा भाग टाळण्यासाठी मिसिंग लिंक हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला. त्यासाठी खोपोलीपासून लोणावळ्यातील कूसगाव येथे बाहेर जाण्यासाठी दुहेरी बोगदा बांधला आहे. (Big news Missing link Project work on Mumbai Pune Expressway is 90 percent complete)
मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे. तर प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. खंडाळा येथील केबल स्टेड पुलामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाटात जावे लागणार नाही. परंतु प्रवासा दरम्यान लोणावळ्यात प्रवेश करायचा असेल तर खंडाळा घाटातून जावे लागणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी तरुणाला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ; वडगाव कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– मोठी बातमी : इंद्रायणी नदीत बुडून मुलाचा मृत्यू… ‘तो’ बुडाला हे मित्रांनी कुणालाच सांगितले नाही, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
– भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Accident News