Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण बैठक मंगळवारी (दि. १३) संपन्न झाली. लोणावळा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे. परंतु असे असतानाही नगरपरिषदेच्या पहिल्या बैठकीत नियमानुसार उपनगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत भारतीय जनता पार्टी पक्षाचे देविदास भाऊसाहेब कडू यांची बिनविरोध निवड पार पडली. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे हे या सभेचे पीठासन अधिकारी होते. त्यांना सहायक म्हणून मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी काम पाहिले.
विहित कालावधीमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी देविदास कडू यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे नगराध्यक्ष सोनवणे यांनी घोषित केले. लोणावळा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, भाजपाचे ४, काँग्रेसचे ३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक, तर अपक्ष तीन असे बलाबल आहे. स्वीकृत नगरसेवकाची संधी संख्याबळानुसार राष्ट्रवादीला दोन व भाजपाला एक असे जाणार होती. मात्र भाजपामधील अंतर्गत वादामुळे पक्षाचा गट स्थापन होऊ शकला नाही आणि याच संधीचा फायदा घेत काँग्रेस 2 आणि अपक्ष 2 यांनी एकत्र येत चार जणांची आघाडी स्थापन करत, त्या माध्यमातून गट बनवित स्वीकृत नगरसेवक पद मिळवले आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून काँग्रेसचे निखिल कवीश्वर यांना संधी देण्यात आली, तर काँग्रेस व अपक्ष यांच्या आघाडीमधून मुकेश परमार यांना संधी देण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आघाडीकडून जाकीर खलिफा यांना देखील स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली होती. मात्र कागदपत्रांमधील तांत्रिक त्रुटीमुळे ही निवड होऊ शकलेली नाही.
निखिल कवीश्वर हे तब्बल तीन वेळा स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात दाखल झाले आहेत. त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदाची हॅटट्रिक केली आहे. मुकेश परमार यांनी नांगरगाव प्रभागातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचेदेखील यानिमित्त पुनर्वसन झाले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक
