Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या पक्षाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अधिकृत पाठिंबा दिला असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. महायुतीला भाजपकडून झालेल्या तीव्र विरोधानंतर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अधिकृत पाठिंबा दिला असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार सुनील शेळके म्हणाले, “शरद पवार यांच्या पक्षाचा आम्हाला पाठिंबा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते आमच्यासोबत आहेत. शरद पवारांच्या विचारांची मते राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वरिष्ठांशी चर्चा करून हा पाठिंबा देण्यात आल्याची माहिती शरद पवार गटाचे लोणावळा शहराध्यक्ष नासिर शेख यांनी दिली.
विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे लोणावळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी एकत्र येत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार शेळके म्हणाले, “ही माझी सहावी–सातवी निवडणूक आहे. लोक आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. लोणावळ्यात बदल हवा आहे, अशी जनतेची भावना आहे. उद्या अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा आहे. विधानसभेत माझ्यावर अनेक आरोप झाले, पण कुणी भीक घातली नाही. उलट २०२४ च्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आलो,” असेही शेळके म्हणाले.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले, “भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. नगरपालिकेत जाऊन खून केला. असा उमेदवार देण्याव्यतिरिक्त भाजपकडे दुसरा पर्याय नव्हता का? भाजपने गुन्हेगारांना उमेदवारी देऊन दहशतीचे राजकारण करू नये. आम्ही दिलेल्या कोणत्याही उमेदवारावर एकही गुन्हा दाखल नाही.”
सुरेखा जाधव यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना शेळके म्हणाले, “ते आधी चार भिंतींच्या आत बोलत होते; आता रस्त्यावर बोलत आहेत. लोणावळ्याचे नागरिक योग्य नेतृत्व निवडतील. पाच कोटींना तिकीट विकल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, “अशा प्रश्नांना पत्रकारांनी महत्त्व देऊ नये. सुनील शेळके कोण आहेत हे नागरिकांना माहीत आहे,” असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत महायुती टिकणार की नाही, हे उद्या स्पष्ट होईल. “ठरल्याप्रमाणे मी भाजपच्या उमेदवाराचेही काम करेन,” असेही मत सुनील शेळके यांनी व्यक्त केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana
