पवना धरण येथे पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सागर कैलास साठे (वय 28 वर्षे, रा. देहूरोड, ता. मावळ, जि. पुणे) असे धरणात बुडून मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सागर साठे हे त्याचे मित्र स्टीफन जॉन (35 वर्ष), स्वप्नील कुमार गायकवाड (33 वर्ष) आणि गिदुथुरी रोनाल्ड वन सिडनी यांच्यासोबत पवना धरण येथे कॅम्पिंगवर मुक्कामी आले होते. आज, रविवारी (दि. 21 जुलै) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास सागर साठे हे पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. त्यावेळी खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.
तिथे उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर सागरचे मित्र आणि मिल्ट्री कॅम्पमधील नवनाथ करंजुले यांनी त्याना पाण्याबाहेर काढले. सीपीआर दिला आणि ग्रामीण रुग्णालय काले-कॉलनी येथे नेले. मात्र डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील ही घटना असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.