आपल्या पोटचं लेकरू ज्याला आपण जन्म झाल्यापासून सांभाळतो… तोच जीव पुढे आपल्याला आपल्या जीवापेक्षा अधिक होऊन जातो.. मात्र नियतीचा फेरा कधीकधी आपल्या अशाच प्राणाहून प्रिय असलेल्या व्यक्तीला जेव्हा घेऊन जातो आणि तेव्हा होणारं दुःख हे आपल्याशिवाय कुणीही समजू शकत नाही… अगदी तसंच मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील शेतकरी तानाजी पडवळ यांचं आताचं दुःखही कुणीच समजू शकणार नाही…
वेळ साधारण रात्री 11-12 होती… चारा खाऊन तृप्त झालेली गोठ्यातील जनावरे निद्रेच्या अधीन होत होती… तर आपल्या लेकरांसारखी प्रिय जनावरे पोठभर जेवू घालून तानाजी पडवळ हेही कुटुंबीयासंह घरात पहुडले होते… अन् तेव्हाच नियतीचा विचित्र फेरा आला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं… शॉर्ट सर्किटमुळे जनावरांच्या गोठ्याला आग लागली… क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले आणि जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली… आगीचे लोट पाहून तानाजी पडवळ आणि कुटुंबीय जागे झाले… हा हा म्हणता गावही गोळा झालं… जनावरांना वाचवण्याचे, आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न झाले, पण काळाच्या पुढे कुणाचेच काही चालत नाही, अगदी तसंच तीन लेकरं दगावीत त्याप्रमाणे तीन उमदे बैलं आगीच्या कोपात दगावले आणि दोन बैलं आज मृत्यूच्या दारात अडखळून पडलीत…
मावळ तालुक्यातील नावाजलेले बैलगाडा मालक आणि प्रगतशील शेतकरी असलेले तानाजी पडवळ यांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा दुःखद प्रसंग आणि कठीण काळ आहे… त्यांच्याशी बोलत असताना त्यांना झालेलं दुःख, त्यांचा आक्रोश समजत होता.. त्यांच्या वेदना त्यांच्या शब्दातून बाहेर पडत होत्या.. खरंच शेतकऱ्याचं दुःख हा फक्त शेतकरीच समजू शकतो, याची जाणीव पुन्हा एकदा झाली… पत्रकारितेचा भाग म्हणून त्यांना काही प्रश्न विचारत होतो, पण त्यातही त्यांच्या शब्दातील वेदना, उत्तरांतील निर्विकारपणा त्यांच्या जिवनातील एक आनंद कायमचा निघून गेल्याचं दाखवून देत होता…
पत्रकारितेत कधीकधी माणूसपणाची तत्वे अडवून ठेवत पुढे जावं लागतं.. काही प्रश्न तसेही विचारावे लागतात… पण तेव्हा आपल्यालाही होणारा त्रास, याची अनुभूती आज खुप दिवसांनी झाली… तानाजी पडवळ यांना लवकरात लवकर सरकारी मदत मिळावी.. त्यांच्या जीवनातला आनंद पुन्हा यावा आणि पुन्हा कधीच कुठल्याही शेतकऱ्याच्या वाट्याला असं दुःख येऊ नये हिच प्रार्थना.
– विशाल कुंभार (संपादक – दैनिक मावळ)
( Bull Shed Fire Three Bulls Died At Navlakh Umbre Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा