Dainik Maval News : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मावळ तालुक्यातील कामशेत गावच्या हद्दीतील कामशेत खिंडीत कार्तिकी वारीसाठी आळंदीला चाललेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव वेगातील कंटेनर घुसल्याने एक महिला वारकऱ्याचा कंटेनरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला असून, इतर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी ( दि. 11 ) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांसह वारकऱ्यांनी जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करुन दोन्ही बाजूकडील वाहतूक चार तास रोखली होती. यामुळे दोन्ही बाजूकडे वाहनांच्या सहा ते सात किलोमीटर अंतरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मागील पाच वर्षात राज्यातील विविध रस्ते व महामार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीच्या अपघातात अनेक वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, अनेक वारकरी जखमी झाल्याने दिंडीतील वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मावळात दिंडीतील वारकऱ्यांच्या अपघाताची हि दुसरी घटना आहे.
मंजुळा प्रभाकर तांडेल (वय -५४, रा. करळपाडा, उरण, रायगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्याचे नाव असून, जखमींमध्ये दत्तात्रय विष्णु घरत (वय-६२, रा. चिरनेर, उरण, रायगड), हिराबाई पोशा पाटील (वय-६५), शारदा नितीन ठाकूर (वय-५१),कामिनी दत्तात्रय गांधी (वय-३०, तिघेही रा. चिरले, उरण, रायगड), अपर्णा अनंत ठाकूर (वय-४२, रा. जासई, उरण, रायगड), अशोक पायप्पा गंधाला (वय-३०, रा. वर्सोवा, अंधेरी, मुंबई), प्रभाकर लक्ष्मण तांडेल (वय- ६२, रा. करळपाडा, उरण, रायगड) या वारकऱ्यांसह नंदू अप्पा चोपडे (वय- ५५, रा. नायगाव, मावळ), ज्ञानदेव निवृत्ती गाडे (वय -५७, रा. नाणोली, मावळ), तानाजी पुनाजी हेमाडे (वय-२७, रा. वडेश्वर, मावळ) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी कंटेनर चालक चंद्रशेखर रमाकांत (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरोधात कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उरण, रायगड जिल्हा व उरण तालुक्यातील संत श्रेष्ठ महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा उरण पनवेल विभाग पायी दिंडी हि ७ नोव्हेंबरला जासई येथील शंकर मंदिर येथून कार्तिकी वारीसाठी आळंदीला निघाली होती. या दिंडीत एकूण सव्वाशे वारकरी सभासद होते.
सोमवारी रात्री हि दिंडी जुना कामशेत येथील श्री. भैरवनाथ मंदिरात मुक्कामी होती. मंगळवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दिंडी येथील जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून आळंदीकडे मार्गस्थ होण्यासाठी मार्ग ओलांडत होती. यादरम्यान पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अश्विनी कंटेनर मुव्हर्स प्रा. लिमिटेडच्या कंटेनर (क्रमांक -एमएच-४६/बीयु-४१७२) चालकाचे येथील तीव्र उतार व वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट दिंडीत घुसला आणि एका महिला वारकऱ्याला चिरडून काही वारकऱ्यांसह एका रिक्षाला धडकला.
या विचित्र अपघातात महिला वारकऱ्याचा कंटेनरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर सात वारकऱ्यांसह इतर तिघे असे १० जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच काही क्षणातच संतप्त कामशेत ग्रामस्थांसह वारकऱ्यांनी जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून ठिय्या आंदोलन करुन मार्ग रोखून धरला. घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी करून स्थानिक व उपस्थितांच्या मदतीने अपघातातील जखमींना उपचारासाठी तत्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची विनंती केली.
मात्र, याठिकाणी सातत्याने होणाऱ्या जीवघेण्या अपघातामुळे स्थानिकांचा पाराच चढला. येथे होणाऱ्या अपघातामुळे स्थानिक गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे स्थानिकांची मानसिकता डळमळीत होत आहे. जोपर्यंत याठिकाणी येथील अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यासाठी संदर्भात ठोस निर्णय घेत नाही. तसेच वरिष्ठ अधिकारी याठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रोखून धरणार असल्याचा पवित्रा आंदोलक ग्रामस्थांनी घेतला होता.
याठिकाणी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे, कामशेत पोलिस निरीक्षक शंकर पाटील, तहसीलदार विक्रम देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत यासंदर्भात आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तरीही आंदोलक ग्रामस्थ माघारी घेत नव्हते. अखेर खासदार श्रीरंग बारणे यांनी घटनास्थळी भेट देवून ग्रामस्थ व वारकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या घटनेमुळे आंदोलकांनी चार तास मार्ग रोखल्याने शालेय विद्यार्थ्यी, कामगार, दुग्ध व्यवसायिकांसह या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. तसेच कामगार व शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असुन, त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.
या घटनेचा पुढील तपास कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निरिक्षक बालाजी लोसरवार हे करीत आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी व आर्थिक मदतीची मागणी मयत मंजुळा तांडेल यांच्या नातेवाईकांसह वारकऱ्यांनी केली.
प्रशासन अजून किती जणांचे बळी घेणार- संतप्त ग्रामस्थ
जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हा परिसर तीव्र उतार व नागमोडी वळणासह चढणीचा असल्याने या ठिकाणी सातत्याने जीव घेणे अपघात होतात. विशेषतः मागील वर्षापासून या ठिकाणी होणाऱ्या अपघात कंटेनरसह इतर अवजड वाहनांच्या अपघाताची संख्या अधिक आहे. अशा अपघातात मयत होणाऱ्यांसह जखमींच्या किंकाळ्या व आक्रोश येथील ग्रामस्थांच्या कानावर सातत्याने आदळत असल्याने ग्रामस्थांची मानसिकता डळमळीत झाली आहे. तसेच या मार्गाच्या अलिकडे व पलिकडे गावातील नागरिक व त्यांची शेती तसेच लोणावळा, कामशेत अथवा इतर ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेतीच्या कामासाठी ये- जा करणाऱ्या ग्रामस्थांना हा मार्ग जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागतो. मागील अनेक वर्षांपासून आम्ही अशा अपघाती घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. तरी संबंधित प्रशासन व यंत्रणांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने, प्रशासन अजून किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला.
अपघातातील मयताच्या नातेवाईकांसह जखमींना शासकीय मदत करणार – खासदार श्रीरंग बारणे
हि अत्यंत दुर्देवी आहे. अपघातास कारणीभूत असणाऱ्या कंटेनर चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच सर्व जखमींना शासकीय तसेच डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण उपचाराचा खर्च करण्यात येणार आहे. या मार्गावरून ज्या ज्या वेळी दिंड्या जाणार असतील त्या त्या वेळी या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्या संदर्भात निर्णय घेतला जाईल. तसेच या ठिकाणच्या घडणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन उड्डाण पूल, भुयारी मार्गासह चौपदरीकरणाच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– टाकवे-नाणे गटातील प्रमुख दावेदार डॉ. अशोक दाते यांचा जनसंपर्क दौरा ; भक्तिभावाच्या वातावरणात नागरिकांचे उत्स्फूर्त स्वागत
– मावळ तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी ; मेघाताई भागवत यांना आंबी गावात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Megha Bhagwat
– काले-कुसगांव गटातील भाजपाचे इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर दळवी यांनी घेतली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट
