Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक व दोन स्वीकृत सदस्यांची निवड सोमवारी (दि. १२) जाहीर होणार असल्याची माहिती वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
गेल्या २ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या १७ पैकी नऊ जागांवर विजय मिळवून नगरपंचायतीमध्ये बहुमत प्राप्त केले. भाजपने सहा जागा मिळवल्या तर दोन प्रभागांत अपक्षांनी विजय प्राप्त केला.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्यासह सर्व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे स्वतंत्र गट असणार आहेत. दोन्ही पक्षांनी गट स्थापनेची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गटनेतेपदी अजय म्हाळसकर यांची तर पक्षनेतेपदी माया चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.
भाजपने गटनेतेपदी दिनेश ढोरे यांना पुन्हा संधी दिली असून, विरोधी पक्षनेत्या म्हणून अर्चना म्हाळसकर, पक्ष प्रतोदपदी अनंता कुडे तर समन्वयकपदी अपक्ष नगरसेविका सारिका चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.
नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. १२) होणार आहे. त्याचवेळी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. बहुमत असल्याने हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असून, पक्षाने उपनगराध्यक्ष पदासाठी सुनील ढोरे यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
भाजप ही निवडणूक लढविणार की त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर करणार याबाबत उत्सुकता आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपने संदीप म्हाळसकर यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या नावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला असल्याचे समजते. या दोन्ही स्वीकृत सदस्यांची निवड उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर जाहीर होणार आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
सकाळी १० ते १२ उमेदवारी अर्ज दाखल करणे, दुपारी १२ ते १२.१५ अर्जाची छाननी, दुपारी १२.१५ ते १२.३० उमेदवारी अर्ज मागे घेणे, दुपारी १२.३० ते १ निवडणूक.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
– येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– …तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक
