Dainik Maval News : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात येत आहे. वीस लाख कुटुंबांच्या जीवनात एकाचवेळी आनंद निर्माण करण्याचा हा क्षण अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक आहे, येणारी दिवाळी तुमच्या नवीन घरात सुखा-समाधाने साजरी करा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरीता आपण व आपल्या भावी पिढीने भरीव योगदान द्यावे, असे आवाहन देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
- ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने श्री छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी पत्राचे वाटप आणि 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, माधुरी मिसाळ, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, बापुसाहेब पठारे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.
- भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न प्रधानमंत्री मोदी पाहत आहेत असे सांगून अमित शाह म्हणाले, विकसित राष्ट्र म्हणजे भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःचे घर, वीज, शौचालय, गॅस सिलिंडर, धान्य, पाच लाख रुपयांचे आरोग्य सुविधा हीच विकसित राष्ट्राची संकल्पना आहे. घर म्हणजे केवळ चार भिंती नसून येणाऱ्या पिढीचे विकासाचे पहिले पाऊल याच घरात पडते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांना घरी देण्याबरोबरच शौचालय देऊन त्यांच्या सन्मानाने स्वाभिमानाची सुरक्षा केली आहे. यासाठी देशात ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणाच्या माध्यमातून महिला, दिनदुर्बल, दलित, आदिवासी अशा सर्व घटकांना घरकुले देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून सन 2029 पर्यंत देशात पाच कोटी घरे देण्यात येणार असून यापैकी तीन कोटी 80 लाख घरे बांधून पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 13 लाख 57 हजार घरकुले मंजूर करण्यात आली असून आता दुसऱ्या टप्प्यात 20 लाख घरे देण्यात येत आहेत. ही सर्व घरे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजनही महाराष्ट्र शासनाने केले आहे.
केंद्र शासन करत असणाऱ्या लोककल्याणकारी योजनांबद्दल बोलताना अमित शहा म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी लोकांना प्रत्येकी दरमहा पाच किलो मोफत धान्य देऊन त्यांचे अन्नसुरक्षा निश्चित केली आहे. चार कोटीहून अधिक लोकांना घरे व वीज देऊन त्यांची गृह सुरक्षा निश्चित केली आहे. 13 कोटी लोकांना शौचालय देऊन महिलांच्या सन्मान राखला आहे. 36 कोटी आयुष्यमान भारत कार्ड वितरित करून लोकांची आरोग्य सुरक्षा निश्चित केली आहे. एक कोटी लखपती दीदी तयार करून गरीब महिलांना सन्मानाचे जीवन दिले आहे. तर 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले.
- पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, केंद्र शासन महाराष्ट्रासाठी अनेक पायाभूत प्रकल्प साकारत आहे. महाराष्ट्र शासनही अनेक मोठे प्रकल्प राबवित आहे. जलसिंचन योजना अंतर्गत गोसीखुर्द, टेंभू या प्रकल्पांबरोबरच जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुष्काळमुक्तीकडे नेले आहे. नदीजोड प्रकल्पांतर्गत नारपार, दमणगंगा, गोदावरी, वैतरणा या नद्यांची कामे सुरू आहेत. 11 वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. अमृत भारत योजनेअंतर्गत 138 रेल्वे स्टेशनचे पुनर्निर्माण झाले आहे. मुंबई, पुणे, नागपूर मध्ये मेट्रो रेल्वेची कामे गतीने आहेत. शिर्डी, सिंधुदुर्ग मध्ये नवीन विमानतळ होत आहे. 13 हजार कोटी रुपये खर्च करुन मरीन ड्राईव्ह, बांद्रा, वरळी सि लिंक जोडण्यासाठी मुंबई कोस्टल रोडची निर्मिती होत आहे. वाशी पुलाचे विस्तारीकरण आणि मेट्रो फेज वनचे कामे झाली आहेत. अटल सेतू प्रकल्प हा संपूर्ण जगात एक अद्भुत प्रकल्प आहे. 76 हजार कोटी रुपये खर्चून जगातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट आणि भारतील सर्वात मोठे बंदर महाराष्ट्रातील वाढवण येथे निर्माण होत आहे.
वैनगंगा, नळगंगा जलसिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून 3 लाख 71 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून याकरीता 85 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. 2 हजार 200 कोटीरुपयांचा खडकवासला ते फुरसुंगी 34 किलोमीटर सुरंग बनविण्याचे काम ही मंजूर झाले आहे. पुणे आणि कोल्हापूर विमानतळांवर नवीन टर्मिनल बनविण्यात आले आहे. टाटा पॉवर बरोबर 2 हजार 800 मेगावॉटचा हायड्रो स्टोरेज प्रोजेक्टही विकसित करण्यात येत आहे. शिरवळ, पुणे आणि भिवपुरी रायगड येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले असल्याचेही शहा यावेळी म्हणाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा