Dainik Maval News : शिधापत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आता ‘ई- केवायसी’ पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ‘ई- केवायसी’करण्यासाठी विविध अडचणी येत असल्याने अनेक लाभार्थ्यांनी या प्रक्रियेला तितका प्रतिसाद दिला नाही. मात्र आता केंद्र शासनाकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
‘ई-केवायसी’ न झालेल्या शिधापत्रिकाधारकांचे रेशन बंद केले जाणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी तातडीने ‘ई-केवायसी’करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्य शासनाने धान्य वितरणात होणारी गळती रोखण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना ‘ई- केवायसी’ बंधनकारक केली आहे. राज्यातील सर्व ग्राहकांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेला जोडण्यात आले आहेत. तरी देखील वितरणात 2 ते 4 टक्क्यांची गळती असल्याचे दिसून आले. हे प्रमाण 100 टक्के कमी करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ‘ई-केवायसी’ बंधनकारक केली आहे.
शिधापत्रिकेवरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्ययावत आधार कार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन ‘फोरजी ई-पॉस मशीन’मध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे स्कॅन केले जात आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हर डाऊन असल्याने ‘ई- केवायसी’ व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना ‘ई- केवायसी’ करता आली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आता या प्रक्रियेस 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
नागरिकांनी लवकरात लवकर ‘ई- केवायसी’करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या निर्णयामुळे ज्यांनी ‘ई-केवायसी’केले नाही. त्यांना 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अनेक शिधापत्रिकेतून मयत लाभार्थ्यांचे किंवा लग्न झालेल्या मुलींची नावे वगळण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शासनाकडून ही मोहीम राबविण्यात आली आहे. ‘ई-केवायसी’ न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचे रेशन बंद करण्यात येणार आहे. कोणत्याही रेशन दुकानदाराकडून ‘ई-केवायसी’ करता येते. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी 31 डिसेंबर पुर्वी ‘ई-केवायसी’ करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी तरुणाला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ; वडगाव कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– मोठी बातमी : इंद्रायणी नदीत बुडून मुलाचा मृत्यू… ‘तो’ बुडाला हे मित्रांनी कुणालाच सांगितले नाही, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
– भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Accident News