Dainik Maval News : केंद्र शासनाच्या सहकार विभागाने सुरू केलेल्या ‘सहकारातून समृद्धी’ अभियानांतर्गत देशात दहा हजार बहुद्देशीय प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, दुग्ध संस्था, मत्स्य व्यवसाय संस्था स्थापन झाल्या आहेत. या संस्थांचा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत राज्यातही गाव पातळीवर सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करून, त्या संस्थांच्या माध्यमातून पतपुरवठ्यासह नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच या नागरिकांना सहकार चळवळीशी जोडून घेतले जाणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
‘सहकारातून समृध्दी’ अंतर्गत देशपातळीवर आयोजित दहा हजार नवनिर्मित बहुद्देशीय प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, दुग्ध संस्था, मत्स्य संस्थांच्या शुभारंभ कार्यक्रमानिमित्त झालेल्या विशेष राज्यस्तरीय कार्यक्रमात पाटील बोलत होते. नवी दिल्ली येथून केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण यावेळी दाखविण्यात आले.
सहकार चळवळीमुळे आपल्या राज्याची प्रगती झाली असून सहकारी साखर कारखाने, सहकारी पतपुरवठा संस्था यामुळे राज्यातील अर्थकारणाला गती मिळाली. सहकार चळवळ अधिक बळकट करून गाव पातळीवर सहकारी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाने सहकारातून समृद्धी अभियान हाती घेतले आहे. गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सोसायटीने पतपुरवठा करण्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवा पुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा. यामुळे जास्तीत जास्त लोकांना सहकार चळवळीशी जोडून घेता येईल. तसेच सहकारी संस्थांच्या उत्पन्नात भर पडून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असे बाबासाहेब पाटील यावेळी म्हणाले.
राज्यातील अनेक भागात सहकारी दुग्ध संस्थांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाचा विकास झाला आणि शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले. याच धर्तीवर मराठवाड्यातही सहकारी दुग्ध संस्थांच्या उभारणीला पाठबळ देवून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले जातील. यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि मदर डेअरी यांचे सहकार्य घेतले जाईल, असे सहकार मंत्री पाटील म्हणाले.
सहकार संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज
महिलांनी आज सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता सहकारी संस्थांमध्येही महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. महिलांकडे असलेल्या आर्थिक बचतीच्या कौशल्याचा सहकारी संस्था चालविता नक्कीच उपयोग होईल, असा विश्वासबाबासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल ; दुपारी बारानंतर प्रवास करावा…
– मावळात होणार हरिनामाचा गजर ! कामशेत येथे एक जानेवारीपासून भव्य ‘कीर्तन महोत्सव’ – पाहा वेळापत्रक
– महाराष्ट्रात शुक्रवार – शनिवार दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज ; सोमवारपासून थंडी वाढणार