Dainik Maval News : खडकवासला आणि पवना धरण या जलाशयांच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे झाल्याची कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. अतिक्रमण करणाऱ्यांना वेळोवेळी नोटिसा बजाविण्यात आल्या असून, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अतिक्रमणे काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही विखे-पाटील यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राजेश राठोड, अशोक उर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी, डाॅ. प्रज्ञा सातव, धीरज लिंगाडे यांनी विधानपरिषदेमध्ये खडकवासला व पवना धरण परिसरातील अतिक्रमणांचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना विखे पाटील यांनी ही कबुली दिली. ( Encroachments in restricted area of Pavana Dam Reservoir Maval said Minister Radhakrishna Vikhe-Patil )
- खडकवासला, पवना या धरणांच्या जलाशयांच्या क्षेत्रातील जलसंपदा विभागाच्या सुमारे एक हजार एकर जमिनीवर अतिक्रमण झाले असून दोन्ही धरणांच्या अतिक्रमण केलेल्या जागांवर पाचशेहून अधिक बंगले, लाॅन, रिसाॅर्ट उभारण्यात आले आहेत. तसेच भराव घालून बेकायदा जमीन हस्तगत करण्यात आली आहे. त्यामुळे धरमातील पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली असून जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे का, आणि जलाशयांच्या क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने कोणती कारवाई केली आहे, अशी विचारणा आमदारांनी केली होती.
त्यावर उत्तर देताना, ‘खडकवासला आणि पवना धरणाच्या जलाशयांच्या बुडीत क्षेत्रात आणि जलसंपदा विभागाच्या हद्दीत कोणतीही बांधकामे झालेली नाहीत. मात्र, जलाशायंच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधितांना वेळोवेळी रितसर नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे,’ असे विखे-पाटील यांनी सांगितले.
पाण्याखालील क्षेत्रात अतिक्रमणे नाहीत
खडकवासला व पवना धरणाच्या पाण्याखालील क्षेत्रात अतिक्रमणे झालेली नाहीत. धरणांमधील पाणी साठवण कमी झाली नसून जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. धरण व कालव्यांच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणांसंदर्भात महसूल आणि वन विभागा, गृह विभाग आणि महापालिकेने संयुक्त कारवाई करावी, अशी सूचना यापूर्वीच संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे. धरण जलायशाच्या बाजूने असणाऱ्या अतिक्रमणांना नोटीस बजाविण्यात आली असून काही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत. उर्वरीत अतिक्रमणेही काढून टाकण्यात येतील, असे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री
– पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News
– चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News