Dainik Maval News : स्वच्छ वडगाव आणि सुंदर वडगाव घडविण्यासाठी कचरा व्यवस्थापन आणि त्याची अचूक अंमलबजावणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी जितके नागरिकांचे सहकार्य गरजेचे ठरते, तितकेच संबंधित यंत्रणेकडूनही तत्परता आवश्यक आहे. शहरात घंटागाड्या वेळेवर येणे, कचऱ्याचे योग्य रित्या संकलन होणे, कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाणे या सर्वच गोष्टी जर ठरविलेल्याप्रमाणे घडल्या तरच वडगाव शहर हे स्वच्छ आणि सुंदर होईल.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मावळ दौऱ्यावर असताना त्यांनी देखील स्वच्छतेत वडगाव शहर अग्रस्थानी येऊ शकेल असे काम करावे, असे सूचवले होते. वडगाव नगरपंचायतीने देखील स्वच्छ वडगाव शहराचा संकल्प केला आहे. तसेच मावळचे आमदार सुनील शेळके हे ही स्वच्छतेचा आग्रह धरतात. मात्र वडगाव शहरातील कचरा व्यवस्थापन, त्यासंदर्भातील संपूर्ण यंत्रणा यांचा भोंगळ कारभार वेळोवेळी समोर येतो आहे.
नागरिकांनीच अनेकदा तक्रारी केल्याप्रमाणे शहरातील अनेक ठिकाणी वेळेवर घंटागाडी येत नाही, तसेच बिल्डिंग असलेल्या ठिकाणी अधिकवेळ गाड्या थांबत नाही, त्यांचा आवाज सर्व मजल्यांवर पोहोचत नाही, कचरा गोळा करण्यापूर्वीच अनेकदा घंटागाड्या भुरर्कन निघून देखील जातात. त्यामुळेच साठलेला कचरा कुठेतरी टाकून देण्याचा प्रकार समोर येतो. दुसरीकडे वडगाव बाजारपेठ आणि वडगावच्या परिघात असणाऱ्या रस्त्यांवर ही कचरा टाकला जाण्याचे प्रमाण दिसून येते.
मुळात कचरा संकलनाची आणि व्यवस्थापनाची योग्य प्रकारे अंमलबजावणी वडगाव शहरात सध्यस्थितीला होताना दिसत नाही. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही शहरातील कचरा व्यवस्थापनावर लक्ष नसलेले दिसते. हे संपूर्ण विश्लेषण करण्यापाठीमागचे कारण म्हणजे वडगाव शहरातील प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या वडगाव शहरातील एकमेव स्मशानभूमी असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीच्या द्वारा जवळ गेल्या अडीच आठवड्यांपासून एक कचरा गोळा करणारे वाहन उभे आहे.
सदर वाहन बंद अवस्थेत असलेले दिसून येते, महत्त्वाची म्हणजे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची नाव लिहिलेली ही कचरा संकलन करणारी गाडी कचरा भरलेल्या अवस्थेत मागील दोन ते अडीच आठवड्यांपासून तिथेच उभी असलेली स्थानिक सांगत आहेत. ही गाडी कुणाची आहे, ती तिथे कोणी आणली, कुठल्या कंत्राटदाराची आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही, त्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही देखील करीत आहोत. परंतु भरलेला कचरा असलेल्या अवस्थेतील ही गाडी दोन ते अडीच आठवडे स्मशानभूमी जवळ असणे आणि त्याकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष नसणे, यातून कचरा व्यवस्थापन संकलन करणाऱ्या वडगाव नगरपंचायतीच्या यंत्रणेचा भोंगळ कारभार दिसून येतो. आता कचऱ्याची गाडी उभी आहे म्हटल्यानंतर कचरा टाकला जाणारच, मग आपण वरील फोटोतही पाहू शकतो की त्या कचराच्या गाडीच्या अवतीभवती देखील अनेक कचऱ्याच्या पिशव्या टाकलेल्या दिसतात.
सद्यस्थितीत या कचऱ्याच्या गाडीमुळे परिसरात दुर्गंध पसरतोय, त्यातून आरोग्याची समस्या निर्माण होत असून ही गाडी तिथून तत्काळ हटवावी, अशी मागणी होत आहे. सोबतच अशा घटना पुन्हा घडू नये व कचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची सक्त अंमलबजावणी अधिकारी आणि नव्याने निवडून आलेले प्रतिनिधी यांनी करावे, अशीही मागणी होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक
