Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पहिल्या टप्प्यातील वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि लोणावळा नगरपरिषद या तीन ठिकाणच्या निवडणुका होत आहेत. स्थानिकच्या निवडणुका या पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असं म्हटलं जातं. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या आणि त्यांच्यातील नेतृत्वाला पुढे आणण्याच्या ह्या निवडणुका असतात. परंतु मावळातील सर्व पक्षाच्या उमेदवारी याद्यांकडे नीट लक्ष टाकल्यास प्रत्येक पक्षाने ‘सक्षम’ उमेदवाराच्या नावाखाली घराणेशाहीला झुकते माप दिल्याचे दिसते.
जेवताना तोंडी लावायला चटणी हवी त्याप्रमाणात एक दोन उमेदवाऱ्या अगदीच जीवावर दगड ठेवून काही सामान्य कार्यकर्त्याला दिल्याही आहेत. परंतु बाकी सर्व अलबेलच आहे. कुठलाही पक्ष असो उमेदवारांच्या यादीत नेत्यांच्या जवळचा, विश्वासातला, नात्यातला, पैशापाण्याने मजबूत अशीच फळी दिसते. इतकंच नाही तर हजारोची संख्या असणाऱ्या शहरांत काही प्रभागात तेच ते उमेदवार किंवा माजींच्या घरातील उमेदवार उभे केलेले दिसते. एकंदरीत काय कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे, ही फक्त नेत्यांची भाषणबाजी उरली असून प्रत्यक्षात घराणेशाही री ओढण्यात सर्व पक्षांनी धन्यता मानलेली दिसते.
समझोत्याच्या नावाखाली सेटलमेंट?
वडगाव वगळता लोणावळा आणि तळेगावात एकोपा आणि शांतता या नावाखाली मोठ्याप्रमाणात बिनविरोध जागा निवडून आल्या. खरेतर शेवटच्या क्षणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अनेक बहादरांनी पुन्हा शेवटच्या क्षणी रिंगणातून माघार घेतली आणि अनेक जागा बिनविरोध आल्या. यात काही ठिकाणी समझोता झाला तर काही ठिकाणी सेटलमेंट झाली, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. परंतु नागरिकांमधील चर्चांना ना नेते कधी गिणतीत पकडतात, ना कुठले पक्ष. एकुणच काय सर्वकाही सुरळीत सुरू आहे, असंच म्हणावं लागेल.
कार्यकर्त्यांनी सावध होण्याची वेळ
खरेतर निवडणुकांमधील सध्याची बदललेली गणिते पाहता सामान्य कार्यकर्त्यांनी देखील आता सावध होणे गरजेचे आहे. नुसते नेत्यामागे पळण्यापेक्षा स्वतःच अस्तित्व जनमाणसात निर्माण करण्यासाठी झटायला हवे. कारण लोकशाहीत जनता जनार्दन हेच राजे असतात आणि एका पातळीनंतर पैसा व दहशत याला जनता देखील भीक घालत नाही. त्यामुळे राजकारणात सक्रीय राहू पाहणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनी स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करण्याची वेळ आली आहे आणि वेळीच सावध होऊन जनतेत रमले पाहिजे, हेच महत्वाचे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
