Dainik Maval News : परतीच्या पावसामुळे मावळ तालुक्यातील खरीप भात पिकाला चांगलेच जीवदान मिळाले आहे. तालुक्यात एकूण 13 हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जात असून योग्य वेळी पडलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यात यावर्षी भाताचे विक्रमी उत्पादन होईल, अशी शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.
मावळ तालुका हा भात पिकाचे आगार असून तालुक्यात सर्वाधिक भात हे पीक घेतले जाते. यावर्षी मान्सूनच्या पावसाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत मावळ तालुक्यात वेळोवेळी आणि गरजेच्या वेळी चांगली हजेरी लावल्याने भात पिकाच्या लागवडी अतिशय चांगल्या आलेल्या आहेत.
- भात पीक हे अखेरच्या टप्प्यात आलेले असताना परतीच्या पावसाचा चांगला उपयोग झाला आहे. मावळात भाताच्या लागवडी या जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात पूर्ण झालेल्या असताना पावसाने चांगला हातभार दिला होता, तर आता हेच भात पीक शेवटच्या टप्प्यात ओंबी भरण्याच्या काळात आले असताना परतीच्या पावसाने योग्य वेळी चांगली हजेरी लावल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात झालेल्या चांगल्या पावसामुळे यावर्षीचे भात पीक अतिशय चांगले आलेले असून यावर्षी विक्रमी भातपीक आलेले आहे. तालुक्यात सुमारे 103 टक्के भात लागवड झाली असून पाऊसही चांगला पडत असल्याने विक्रमी भाताचे उत्पादन होईल अशी आशा वाटू लागली आहे.
मावळ तालुक्यातील खरीप भात पिकाबरोबरच सोयाबीन, भुईमूग, चवळी, मुग, उडीद, वाटाणा ही खरीप पिके घेतली जातात. मात्र यावर्षी अति पावसामुळे सोयाबीन आणि भुईमूग या पिकास मोठा फटका बसून शेतकरी अडचणीत आलेले आहेत. तालुक्याच्या काही गावांमध्ये वातावरणातील बदलामुळे करपा, कडाकर्पा या रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आढळून आला होता. परंतु परतीच्या पावसाने या रोगाची परिस्थिती सुधारेल असे कृषी अधिकारी सांगत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन । Pavananagar News
– पूर्वसूचना न देता केलेल्या ब्लास्टिंगमुळे एकाचा मृत्यू, मंगरुळ येथील घटना, गुन्हा दाखल । Talegaon News
– विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास राज्य सरकारची मान्यता ; 4 हजार 860 पदे विशेष शिक्षकांसाठी राखून ठेवणार