Dainik Maval News : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि. 16) पासून सुरू होत आहे. हे अर्ज केवळ ‘ऑफलाईन’ पद्धतीनेच भरता येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांच्या मुख्यालयी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य आणि 146 पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी 5 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि. 16 )पासून सुरू होईल. 21 जानेवारी ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून, दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. 18 जानेवारी रोजी रविवारची सुटी असल्याने त्या दिवशी उमेदवारीअर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
उमेदवारी अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज व शपथपत्रात संपूर्ण माहिती भरून तो संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांच्या मुख्यालयी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
दि. 22 जानेवारी रोजी नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात येणार असून, त्यावर निर्णय घेतला जाईल. वैध ठरलेल्या नामनिर्देशन अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 27 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 25 व 26 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज मागे घेता येणार नाहीत.
दि. 27 जानेवारी रोजी दुपारी 3.30 नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 5 फेबुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून, 7 फेबुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपलब्ध ठिकाणे
1) जुन्नर : पंचायत समिती कार्यालय, जुन्नर
2) आंबेगाव : तहसील कार्यालय, घोडेगाव
3) शिरूर : नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय शिरूर
4) खेड : उपविभागीय अधिकारी कार्यालय, खेड यांचे कार्यालय, वाडा रोड, राजगुरूनगर
5) मावळ : तहसील कार्यालय, वडगाव मावळ
6) मुळशी : तहसील कार्यालय, मुळशी, पौड
7) हवेली : सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आंबेगाव बुद्रुक, पुणे
8) दौंड : नवीन प्रशासकीय इमारतर, तहसील कार्यालय, दौंड
9) पुरंदर : नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, पुरंदर, सासवड,
10) वेल्हे : तहसील कार्यालय, राजगड, वेल्हे बुद्रुक,
11) भोर : तहसील कार्यालय, राजवाडा चौक, भोर
12) बारामती : तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बारामती
13) इंदापूर : नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, इंदापूर
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक
