Dainik Maval News : मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाचे औचित्य साधत मराठी भाषा वाढावी व मराठीच्या वाचन संस्कृतीचे जतन व्हावे तसेच ती प्रवाहीत रहावी या संकल्पनेतून पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे जानेवारीत आयोजन करण्यात आले आहे. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली असल्याचे प्रांतपाल 3131 शितल शहा यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
शनिवार, दि. 4 आणि रविवार, दि. 5 जानेवारी 2025 रोजी आयोजित संमेलन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. नामवंत साहित्यिक, कवी, विचारवंत, अभ्यासक यांच्या उपस्थितीने हे संमेलन लक्षवेधी ठरणार आहे. संमेलनाचा उद्घाटन सोहळा आणि समारोप वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील तसेच सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.
जागतिकीकरणाच्या काळात भाषाविषयक आव्हाने, त्यावरील उपाययोजना, कृत्रिम बुद्धिमत्तेचे साहित्य विश्वात होणारे फायदे-तोटे अशा विविध कळीच्या मुद्द्यांबद्दल ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक विचारवंतांची मते, ठोस भूमिका चर्चासत्रांच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहेत. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांच्या गीतांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमासह प्रसिद्ध संगीत नाटकाची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे. सुप्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणारे कविसंमेलन विशेष आकर्षण ठरेल असा विश्वास आहे.
रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. रोटरी सदस्यांनी समाजकार्यासह आपल्यातील कला-गुणांना वाव देण्याचाही प्रयत्न केला आहे. आजच्या संगणक तंत्रस्नेही काळात मराठी वाचन संस्कृतीची अभिवृद्धी व्हावी या करिता रोटरी क्लबच्या माध्यमातून साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यप्रेमींनी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन साहित्याचा जागर करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. संमेलन सर्वांसाठी खुले असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे, असे संमेलनाचे संयोजक, रोटेरियन राजीव बर्वे यांनी कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा ; आमदार शेळकेंची अधिकारी व ठेकेदारांना तंबी
– गांजा बाळगल्याप्रकरणी तरूणाला अटक, गहुंजे हद्दीत पोलिसांची कारवाई, 20 लाखाचा मुद्देमाल जप्त । Maval Crime