Dainik Maval News : देहू नगरपंचायत हद्दीतील शासकीय गायरान जमिनीवरील बेकायदेशीर पत्राशेड, बांधकामांसह झालेली अतिक्रमणे काढण्याचा निर्णय देहू नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. देहू नगरपंचायतची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि.१३) नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
यावेळी मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, उपाध्यक्ष मयूर शिवशरण, पाणीपुरवठा सभापती सुधीर काळोखे, गटनेता योगेश परंडवाल, योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, पुनम काळोखे, स्मिता चव्हाण, प्रियंका मोरे, रसिका काळोखे, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम, विविध विभागाचे अधिकारी आदीजण उपस्थित होते.
देहूरोड परिसरामध्ये आढळून आलेले रोहिंग्या व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे, सुरक्षिततेसाठी दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. देहूत शासकीय जमिनीवरील 62 घरकुल आणि 266 नोंदी वगळता दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार 638 अतिक्रमणे आढळून आली होती.
त्यामध्ये 300 हून अधिक पक्की बांधकामे तर पत्राशेड आहेत. मात्र दोन वर्षात आणखी अतिक्रमणे वाढले आहेत. शासन निर्णयानुसार 2011 पूर्वीची नोंदी वगळता इतर अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार करणे आणि त्यांच्या अधिपत्यात शासकीय नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयासह मुख्य प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करण्याचे व गणेशोत्सवातील गणेश विसर्जन कामाच्या ठेकेदाराचा 4 लाख 23 हजाराचा अतिरिक्त झालेला खर्च देणे आणि विविध विभागातील कामाच्या ठेका देण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. बीज सोहळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड प्रकल्पाचे अद्यापही 200 हेक्टर भूसंपादन बाकी, ‘या’ जमीन मालकांना मिळणार 25 टक्के भरपाई । Pune Ring Road
– दोन्ही राष्ट्रवादी एकत्र… आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याने खळबळ, राज्यभर होतीये चर्चा । MLA Sunil Shelke
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी