Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी येत्या बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, तर गट-गणनिहाय अंतिम मतदार यादी यादी 27 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गट-गणांच्या अंतिम रचनेनंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या निवडणुकींच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. आता या रचनेनुसार गट-गणनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
या मतदार याद्या गट-गण रचनेनुसार विभाजन करून मतदान केंद्रनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबतच्या हरकती व सूचना 14 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारून 26 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी घेण्यात येईल. 27 ऑक्टोबर रोजी गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या प्रकाशित होतील, तसेच याच दिवशी मतदान केंद्राची आणि मतदान केंद्रानिहाय मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अहर्ता दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशीपर्यंत विधानसभेच्या मतदार यादीत नाव असणाऱ्यांना मतदान करता येणार आहे.
आयोगाचे आवाहन :
मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे, अशा संदर्भातील दुरुस्त्यांबाबत मतदार हरकती व सूचना दाखल करू शकतात.
गण-गट आणि प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश, नावे वगळणे किंवा नावे-पत्त्यांमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयोग करत नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
चौदा ऑक्टोबरपर्यंत हरकती करता येणार :
एका गटात – गणात राहात असून, नाव दुसऱ्या ठिकाणच्या मतदार यादीत नाव आले असेल, तर प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 14 ऑक्टोबरपर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे हरकत व सूचना दाखल करता येतील, तसेच नगरपंचायत व नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय मतदार याद्यांबाबत हरकती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करता येणार आहेत. त्यावर सुनावणी होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय