पुणे, (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : आपले आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात. पुढं आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवर योग्य वाट दाखवणारे गुरु आपल्याला लाभतात. गुरुंनी दाखवलेल्या वाटेवरुन मार्गक्रमण करुन जीवनाचं सोनं होतं आणि अगदी असाच गुरुंचा परिसस्पर्श लाभला आहे गुणवान युवा संगीतरचनाकार-गायक होनराज मावळे याला. जीवनाचं सोनं करणारा. गुरुपौर्णिमेनिमित होनराजशी संवाद साधला असता उलगडलं गुरुशिष्याचं वंदनीय-सुंदर नातं.
वडिलांकडून मिळाले संगीत संस्कार
संगीत रचनाकार-गायक होनराज हा आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांचा मुलगा. कुटुंबाला संगीताचा वारसा असल्यानं अगदी बालपणापासूनच संगीताचे संस्कार होनराजवर झाले. बालपणी वडीलांसोबत बरयाच शाहीरी कार्यक्रमांत सहभागी होऊन त्यानं शाबासकी मिळवली. वडील नामवंत शाहीर असूनही त्यांनी होनराजला मोठं होईल तसं त्याच्या मनाप्रमाणं आवडीनिवडी जपू दिल्या आणि हवं ते करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं.
संगीतातील पहिल्या गुरुंचा परिसस्पर्श
शालेय जीवनात होनराजचे संगीत शिक्षक ज्येष्ठ हार्मोनिअम वादक व संगीतकार अजय पराड यांच्या परिसस्पर्शानं होनराज संगीतकार म्हणून घडू लागला. होनराजमधील संगीताची जाण ओळखून दहावीत असताना शाळेच्या स्नेहसंमेलनात पराड सरांनी त्याला सांगितिक कार्यक्रमासाठी संगीत संयोजन करण्याची संधी दिली. या कार्यक्रमात होनराजच्या स्वतःच्या संगीत रचनाही होत्या. हा कार्यक्रम दोन हजार प्रेक्षकांसमोर अतिशय सुंदररित्या पार पडला आणि हीच होनराजची संगीतकार व संगीतसंयोजक म्हणून सुरवात ठरली.
शाळेत असताना होनराजला बाक वाजवण्याची सवय होती. हा विद्यार्थी सारखा बाक वाजवतो अशी तक्रार एकदा त्याच्या वर्गशिक्षकांनी पराड सरांकडं केली होती. त्यावर पराड सरांनी होनराजला शिक्षा दिली नाही तर शाळेत सकाळच्या सत्रात बाके व टेबल मागवून होनराजसोबत स्वतः वीस मिनीटं बेंच वादनाचं सादरीकरण केलं आणि फक्त तास सुरु असताना बाक वाजवू नको अशी प्रेमळ सूचना दिली. असे हे विद्यार्थ्यांचे कलागुण त्यांना प्रोत्साहन देणारे पराड सर होनराजला संगीत क्षेत्रात घडवणारे पहिले गुरु.
गुरुंच्या प्रेरणेनं ज्ञानार्जनाची आस
होनराज श्रीमती नंदा गोखले यांचा गायनाचा लाडका विद्यार्थी. मंगेश करमरकर यांच्याकडे तबला शिकला. राजकुमार गायकवाड यांच्याकडे ढोलकी शिकला आणि हरिभक्तिपरायण न. चि. अपामार्जने हे त्याचे किर्तनाचे गुरु. अध्ययनाच्या प्रवासात अनेक गुरुकडून ज्ञान आणि ज्ञानार्जनाची आस घेऊन होनराजनं तब्बल बावीस वाद्यांचं वादनकौशल्य आत्मसात केलंय.
‘संगीतकार’ घडवणारी पाच वर्ष
शास्त्रीय संगीतात करिअर करायचं हे होनराजनं ठरवलं होतं. त्यामुळं फर्ग्युसन महाविद्यालयातून बारावी केल्यानंतर होनराजनं पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात पदवीसाठी प्रवेश घेतला. इथं ज्येष्ठ संगीतकार-हार्मोनिअम वादक डॉ. केशवचैतन्य कुंटे सरांच्या कडक शिस्तीच्या मार्गदर्शनाखाली तो घडला.
पदवीच्या प्रथम वर्षाला असताना कुंटे सरांनी होनराजला विद्यार्थी म्हणून दिलेली संगीतसंयोजनाची मोठी जबाबदारी त्यानं व्यवस्थित पार पाडली होती. त्यापुढंही सरांनी दिलेले धडे गिरवत आणि सरांनीच दिलेली अंगठे धरुन उभारण्याच्या शिक्षेला सामोरं जात होनराजनं पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणात उत्तम कामगिरी करुन दाखवलीये. नामवंत शाहीर हेमंतराजे मावळे यांचा मुलगा या ओळखीबरोबरच संगीतरचनाकार व गायक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलीये.
गुरुंकडून मिळालेली शाबासकी
होनराजला पंडित पद्माकर थत्ते यांच्या नावची शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्ती प्रदान समारंभात अनपेक्षितपणे गुरु कुंटे सरांनी स्वतः आपल्या गुणवान शिष्याचा परिचय करुन दिला, हे होनराजला आपल्या गुरुंकडून मिळालेलं मोठं बक्षीस होतं. ही आठवण, गुरुंनी शिष्यासाठी उच्चारलेला कौतुकाचा एक शब्दही शिष्यासाठी अभिमानाची गोष्ट असते हेच सांगून जाते.
शिष्याच्या प्रगतीचा चढता आलेख
लाभलेल्या सर्व गुरुंच्या मार्गदर्शनानं होनराजनं शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीतात अनेक सुंदर रचनांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये बडा ख्याल, छोटा ख्याल, तराणा, सरगमगीत त्याचबरोबर दादरा, टप्पा अशा रचना आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत कबीर, समर्थ रामदास या संतांच्या विविध अभंगांसाठी संगीतरचना निर्मिल्या आहेत. तसेच नामवंत रचनाकारांनी रचलेल्या रचनांकरता नवीन नाविन्यपूर्ण संगीतरचना केल्या आहेत. महानाट्यांसाठी संगीत रचनाकार म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. विविध संगीत स्पर्धांसाठी परीक्षक म्हणूनही होनराजला निमंत्रित केले जात आहे.
आजवरच्या या कामासाठी होनराजला सन्मानित मिळाले आहेत आणि ही सुंदर कामगिरी होनराजनं आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनानं केली आहे. गुरुंच्या परिसस्पर्शानं त्याच्या संगीत क्षेत्रातील वाटचालीला झळाळी प्राप्त होऊन आयुष्य चमकू लागले आहे.
होनराज म्हणतो….
“माझ्या सर्व गुरुंनी मला घडवलं. माझ्या आयुष्याला शिस्त लावली. त्यामुळं मीही प्रत्येक गोष्ट शिस्तीनंच करायला शिकलो. माझे बाबा-आई जीवनातील पहिले गुरु. बाबांनी लोकसंगीतात खूप मोठं काम केलं आहे तरीही त्यांनी मला त्यांच्याच क्षेत्रात काम करावं असं बंधन कधीही घातलं नाही. माझं करिअर मला माझ्या मनाप्रमाणं निवडू दिलं, हाच गुरु म्हणून असणारा त्यांचा मोठेपणा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुंना वंदन.”